गोविंदराव पटवर्धन यांना ऑर्गन वाजवून श्रद्धांजली

रत्नागिरी : ज्येष्ठ हार्मोनियम आणि ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचा सत्ताविसावा स्मृतिदिन ३० जानेवारी २०२३ रोजी झाला. रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या वेळी त्यांना श्रीरंग हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील उदयोन्मुख कलाकाराने ऑर्गन वाजवून श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे स्पर्धेचे परीक्षक धनंजय पुराणिक (डोंबिवली) यांनी त्याला तबल्याची साथ केली. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे गोविंदराव पटवर्धन यांचे मूळ गाव आहे. कोकणात जन्मलेल्या गोविंदरावांनी वयाच्या आठव्या वर्षापासून ऑर्गनसाथ करण्यास सुरुवात केली. भारतातील सर्व दिग्गज शास्त्रीय गायक कलाकारांबरोबरच सर्व जुन्या-नव्या संगीत नाटकांना त्यांनी ऑर्गनची साथ केली होती. पंधरा हजारपेक्षा अधिक नाट्यप्रयोग त्यांच्या साथसंगतीने झाले आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरीच्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेसाठी आलेल्या पाचही परीक्षकांना त्यांचा निकटचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले आहे.

अडल्या वेळी गोविंदरावांनी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेतही अनेक नाट्यप्रयोगांना ऑर्गनसाथ करून कलाकारांची अडचण दूर केली आहे. कोणत्याही पट्टीमध्ये तितक्याच लीलया वाजवणारे असे गोविंदराव अत्यंत विनयशील, सहृदय, नम्र कलाकार होते. त्यांची सुमारे ५० संगीत नाटके पदांसह तोंडपाठ होती. नाट्यपदांतील गीतांतील अगदी ऱ्हस्व-दीर्घदेखील व्यवस्थित वाजला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. त्यांचे वादन अतिशय सफाईदार आणि स्वच्छ होते. ऑर्गनवादनामध्ये त्यांचे स्थान अत्यंत उच्च कोटीचे आहे. सर्व ऑर्गनवादक त्यांना आपल्या गुरुस्थानी आणि आदर्श स्थानी मानतात. गोविंदराव स्वतः कोणाकडेही शिकलेले नव्हते; मात्र पंडित राम मराठे, पंडित कुमार गंधर्व, पंडित छोटा गंधर्व यांना ते गुरुस्थानी मानत असत. अशा महान ऑर्गनवादकाला मानाचा मुजरा आणि आदरांजली म्हणून श्रीरंग हेरंब जोगळेकर याने ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’ हे गीत वाजविले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply