आणखी एक महामंडळ

चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुढाकाराने कोकणातील लोककलांचा चार दिवसांचा मोठा महोत्सव पार पडला. पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या संपूर्ण कोकणातील विविध ४० लोककलांचा आविष्कार या महोत्सवात घडला. महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीने उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा आपल्या भाषणात केली. आता यथावकाश हे महामंडळ स्थापन होईलच. महामंडळाची घोषणा केली किंवा ती प्रत्यक्षात आली तरी सारे काही झाले, असे नाही. कोकणापुरता विचार करायचा झाला तरी कोकणासाठी अनेक महामंडळे आतापर्यंत अस्तित्वात आली. काही बरखास्त झाली, तर अस्तित्वात असलेली महामंडळे बंद झाली नाहीत, म्हणून चालू आहेत, अशा अवस्थेत आहेत.

लोककला महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर चिपळूणच्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सवाचे संयोजन समितीचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अशी मागणी केली की हे महामंडळ कोकणासाठी स्वतंत्रपणे स्थापन व्हायला हवे. मोजक्या लोककला यावेळच्या महोत्सवात सादर करण्यात आल्या असल्या तरी शंभरावर ज्ञात लोककला त्याचप्रमाणे असंख्य अज्ञात लोककला कोकणात आहेत. त्यांचा शोध तर घ्यायलाच हवा आहे. या साऱ्या लोककलांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र लोककला महामंडळ असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या मागणीची दखल घेतली आहे. त्यामुळे त्यातून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

महामंडळ स्थापन करताना मात्र नेहमीपेक्षा वेगळा विचार करायला हवा आहे. कारण त्या त्या वेळेच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार अनेक महामंडळे स्थापन झाली असली, तरी त्यांचा मूळ उद्देश सफल झाला आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. महामंडळावर खर्च होतो. त्यांच्यासाठी निधीची तरतूद केली जाते. त्याचा विनियोगही होतो, पण पण अपवाद वगळता महामंडळांचा मूळ उद्देश सफल झाला आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागते. सामान्यातल्या सामान्य लोकांना स्वस्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळ अस्तित्वात आले. पण योजण्यासारखे अनेक उपाय असूनही हे महामंडळ तोट्यात गर्तेत आहे. अशा इतर अनेक महामंडळांविषयी सांगता येईल. राजकीय सोयी लावण्यासाठीच या महामंडळांची निर्मिती होते, असाच समज आता रूढ झाला आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी लोककला महामंडळ अस्तित्वात येणार असेल, तर त्याच्या निर्मितीला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण महामंडळाचे उद्दिष्ट आधी निश्चित करायला हवे. त्यानंतरच महामंडळाची स्थापना करावी. उद्दिष्टपूर्ती हे नियोजित महामंडळाचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. विविध घटकांचा समावेश या महामंडळामध्ये झाला पाहिजे. प्रत्येक लोककलेचा एक प्रतिनिधी महामंडळात असला पाहिजे. महामंडळावर शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासारख्या पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थेच्या प्रमुखात्वाखाली हे महामंडळ तयार करता येईल का, त्यासाठी शासनाकडून आर्थिक पाठबळ देण्याची तरतूद करता येऊ शकेल का, असाही विचार व्हायला हवा. सरकारी-खासगी समन्वयातून अलीकडे अनेक संस्थांचे कामकाज चालते. त्याच पद्धतीने खासगी संस्थेच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या महामंडळाला शासकीय महामंडळाचा दर्जा देता येईल का, याचाही विचार करायला हवा. अन्यथा कोकणासंदर्भातील आणखी एक महामंडळ एवढीच त्याची नोंद होईल. ती तशी होऊ नये, याची खबरदारी सुरुवातीपासूनच घेतली पाहिजे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १० फेब्रुवारी २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply