लांजा : तळवडे (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरी काढण्यात आली. तिचा प्रारंभ कोट (ता. लांजा) येथे झाला. सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने ग्रामीण साहित्य संमेलनाची परंपरा सुरू गेली आहे. लांजा किंवा राजापूर तालुक्यात दरवर्षी आलटून पालटून हे संमेलन भरविले जाते. संमेलनापूर्वी क्रांतीज्योत फेरी काढण्यात येते. यावर्षीचे संमेलन तळवडे (ता. राजापूर) येथे होणार ११ आणि १२ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानिमित्ताने क्रांतीज्योतीची फेरी निघाली. रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो, अशा घोषणा देत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव असलेल्या कोट येथून निघालेली ही फेरी लांजा, तळवडे (ता. लांजा), सालपे, शिपोशी, भांबेड, वाटूळ, पाचल मार्गे तळवडे (ता. राजापूर) येथे पोहोचली.
क्रांतीज्योतीच्या प्रारंभाच्या वेळी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गजानन साळवी, प्रकाश पाटोळे, दिनकर नेवाळकर, लांज्याच्या लोकमान्य वाचनालयाचे संचालक विजय हटकर, चंद्रकांत खामकर, अमर खामकर, राजू नेवाळकर, राजू सुर्वे, रूपेश दळवी, मिलिंद पाध्ये, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लांजा येथील लोकमान्य वाचनालयाजवळ या क्रांतीज्योतीचे स्वागत माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे, वाचनालयाचे संचालक विनोद बेनकर, माजी अध्यक्ष विजय नारकर यांनी केले. यावेळी सुभाष लाड, ग्रंथपाल संगीता उपशेट्ये, विजय हटकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

