संगीत डबल लाइफ – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १२ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत डबल लाइफ हे नाटक बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था :

बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग, मुंबई

लेखक : रवींद्र भगवते
दिग्दर्शक : मंचल दर्णे
संगीत दिग्दर्शक : उदय देसाई

काय नाटकाची कल्पना?

वींद्र भगवते लिखित या नाटकाचा या स्पर्धेमध्ये प्रथमच प्रयोग होत असून संगीत आणि विनोद यांच्या साह्याने जुने आणि आधुनिक हे दोन्ही वातावरण या नाटकातून दिसणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संगीतसुद्धा या नाटकातून रसिकांच्या भेटीला येत आहे. उदय देसाई हे प्रतिभावंत संगीत दिग्दर्शक आणि मंचल दर्णे हे दिग्दर्शक यांनी यासाठी खास मेहनत घेतली आहे.

पिंपळवेढेकर कुटुंब आपल्या घरामध्ये शंभर वर्षांपूर्वीची संस्कृती जपत आहे. घरात गजानन आणि बाहेर गॅज असं दोन प्रकारचं जीवन नायकाला जगावं लागत आहे. हे असं का, याला तसंच सयुक्तिक कारण आहे. हे असं डबल लाइफ असल्यामुळे गजाननाला आधुनिक काळातली एकही मुलगी पत्नी म्हणून लाभत नाहीये. गजाननाची आणि त्याच्या वडिलांची यासाठी होणारी धांदल आणि धावपळ म्हणजे हे नाटक.

नाटकविषयी नाटककार रवींद्र भगवते म्हणतात, आज आपण जेव्हा जेव्हा मराठी नाटकांच्या जाहिराती वर्तमानपत्रात पाहतो, तेव्हा संगीत नाटकाची जाहिरात अभावानेच आढळते. संगीत नाटकाची आपली परंपरा ही जपलीच पाहिजे, ही भावना मग अधिकाधिक प्रबळ होते. नाटकांचा प्रेक्षकवर्ग पाहिला तर तोसुद्धा ४५-५० च्या पुढचाच आढळतो. तरुणाईला संगीत नाटकात रस वाटेल, असं संगीत नाटक असावं, असं मला प्रकर्षाने वाटलं. विनोद आणि आधुनिकता यांना जर पारंपरिक संगीताची साथ लाभली, तर अशा प्रकारचं एक सुंदर रसायन होऊ शकेल, असं वाटल्यामुळे मी हे नाटक लिहायला प्रवृत्त झालो. म्हणूनच नाटकात जसं पारंपरिक संगीत आहे, तसंच पाश्चात्य संगीत आणि नृत्याचाही समावेश आहे आणि नाटकाचा काळही आधुनिक आहे. नाटकाचा बाज संपूर्ण विनोदी असल्यामुळे कुठल्याही वयोगटातील माणसाला संगीताबरोबर मनोरंजनही लाभेल आणि ते मनोरंजन सवंग नसेल.

जुनं ते सोनं आहेच, पण नव्यातही हवं हवं असं खूप काही असतं, हा संदेशसुद्धा या नाटकातून मिळेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply