गावोगावी साहित्य संमेलने भरविणे आवश्यक – प्रकाश देशपांडे

तळवडे (ता. राजापूर) : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला समृद्ध करणार्‍या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी केले.

राजापूर लांजा नागरिक संघाचे दोन दिवसांचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन तळवडे येथे आज स्व. गुरुवर्य महादेव कुंडेकर साहित्यनगरीत सुरू झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
(श्री. देशपांडे यांचे संपूर्ण भाषण सोबतच्या लिंकवर – https://kokanmedia.in/2023/02/11/grameensahityasammelan-2023-6/)

आठव्या संमेलनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता नवलादेवी मंदिरापासून ग्रंथदिंडी निघाली. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, माजी सैनिक, एमसीसी विद्यार्थी, लेझीम, ढोलपथक ग्रंथदिंडीत सहभागी झाले. बैलगाडी तसेच घोड्यावर बसलेले बालशिवराय अशा थाटात निघालेली ग्रंथदिंडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आणि त्यानंतर संमेलनाच्या ठिकाणी आली. सरपंच सौ. गायत्री साळवी यांनी ध्वजारोहण केले. पुस्तक प्रदर्शन, चित्रप्रदर्शन, आयुर्वेदिक औषधी प्रदर्शन, शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पूर्व संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर, स्वागताध्यक्ष आप्पा साळवी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.

संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी साहित्य संमेलन भरविण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. स्वागताध्यक्ष आप्पा साळवी यांनी सांगितले की, गावातील तरुणांना रोजगार द्यायलाही हे संमेलन यशस्वी ठरेल, अशी खात्री आहे.

संमेलनाच्या स्मरणिकेचे, तसेच राजेंद्रप्रसाद मसुरकर संपादित कोंकणी माणूस साप्ताहिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था गेल्या सात वर्षांपासून या दोन तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये अनोखे साहित्य संमेलन भरवत आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे या निसर्गसंपन्न गावी आठवे साहित्य संमेलन आज सुरू झाले. सभामंडप भरलेला असला तरी व्यासपीठावर मात्र एकही खुर्ची ठेवली जात नाही, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य यावर्षीही जपण्यात आले.

साहित्यिक विचारांच्या कार्यक्रमात दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. राहुल मराठे यांनी नाट्य परंपरेची ७५ वर्षे याविषयी विचार व्यक्त केले. शस्त्रसंग्राहक सुनील कदम यांनी रामचंद्र अमात्यांचे कर्तृत्व विशद केले. कोकणच्या बंद घरांची चावी स्त्रियांच्या हाती या विषयावर सौ. श्रद्धा कळंबटे यांनी विचारमंथन केले. साहित्यिक मुशाफिरी या कार्यक्रमात कवी अरुण इंगवले यांची मुलाखत धीरज वाटेकर यांनी घेतली. सायंकाळी नागेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात सुभाष लाड, अमोल रेडीज, विजय हटकर, विराज चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, समीर देशपांडे, रामचंद्र खाडे, आशा तेलंगे, प्रिया मांडवकर, लता पाटील, आकांक्षा भुर्के, डॉ. जनार्दन मोहिते, चंद्रसेन जाधव, सुहास आयरे, श्रद्धा कळंबटे आणि नितीश खानविलकर यांनी सहभाग घेतला.

रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता विविध पुरस्कारांचा वितरण समारंभ संघाध्यक्ष सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. मुंबईच्या नगरसेविका सौ. समीक्षा सक्रे उद्घाटन करतील. या सत्राचे स्वागताध्यक्ष तळवडे ग्रामवाचनालयाचे अध्यक्ष मनोहर गवस असतील. यावेळी आमदार राजन साळवी, माजी बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिगंधा सुतार, उद्योजक प्रसाद पाटोळे, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर सुतार, बाजीराव विश्‍वासराव, कुवारबावचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, आरआरपीसीएलचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागावकर, सामाजिक कार्यकर्ते विजय इंदुलकर, लांजा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के, उद्योजक श्रीराम हांदे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply