
तळवडे (ता. राजापूर) येथे राजापूर-लांजा नागरिक संघाने आयोजित केलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे अध्यक्षीय भाषण.
………………………………………………….
राजापूर-लांजा नागरिक संघाच्या वतीने ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होते आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला दिलाय… मला वाटते मी आयुष्यभर ग्रंथालयात केलेल्या सेवेचा हा बहुमान आहे. संयोजक श्री. सुभाष लाड यांना मनःपूर्वक धन्यवाद.
राजापूर आणि लांजा हे दोन्ही तालुके म्हणजे साहित्य विश्वाची अभिमान क्षेत्रे आहेत. या तालुक्यांनी साहित्य आणि कलाक्षेत्राला अफाट देणगी दिली आहे. इथल्या चिमटीत मावेल अशा लहानशा गावांनी साहित्य विश्वाला दिग्गजांची देणगी दिली. मराठी साहित्यातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ पारितोषिक’ प्राप्त करणारे वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर याच अपरान्त भूमीतले. याच राजापूर तालुक्यातल्या एका कशेळी गावात विविध क्षेत्रात गौरवास्पद कार्य करणारी सात व्यक्तिमत्त्वे जन्माला आली. राजर्षी शाहू महाराजांचे निटकवर्तीय आणि बहुजनांचे समर्थक राजारामशास्त्री भागवत, थोर विदुषी दुर्गाबाई भागवत, त्यांच्या भगिनी आणि पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी, इतिहास मार्तंड शेजवलकर, कादंबरीकार वि. सी. गुर्जर, बालसाहित्यात थोर कामगिरी केलेले भा. रा. भागवत ही सारी मंडळी मूळची कशेळीची.
मूळचा आपला रत्नागिरी जिल्हा मंडणगडपासून सावंतवाडीपर्यंत. ही भूमीच मुळी रत्नांची खाण आहे. इथून अनेक इतिहास संशोधक, समाजसुधारक, राजकीय नेत्यांनी संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकविली. मराठेशाही संपली आणि इंग्रजांचे राज्य सुरू झाले. विश्वाच्या दहा दिशा मोकळ्या झाल्या. आमची मने मात्र पूर्वजांच्या पराक्रमाचे गोडवे गाण्यातच धन्यता मानून शहामृगासारखी परंपरांच्या वाळूत तोंड खुपसून राहत होती. अशावेळी इंग्रजांचे राज्य ही संधी आली आहे; इंग्रजी विद्या ही विश्वाची कवाडे उघडायला मदत करणार आहेत. आता महिलांनी चूल आणि मूल या जगण्यातून बाहेर पडायला हवे. स्त्रियांनी आता शिकण्याची गरज आहे, हा विचार महाराष्ट्राला देणारा पहिला महापुरुष म्हणजे बाळशास्त्री जांभेकर! राजापूरपासून जवळ असलेल्या देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले गावात हे नररत्न जन्मले. बाळशास्त्रींच्या काळापर्यंत आपण किती परंपरावादी होतो हे पाहायचे असेल, तर फार नव्हे तर एकेशपाच वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टर डायरीतली नोंद पाहिली तर प्रचंड अस्वस्थता येते. १८१८ साली एका वर्षात आपल्या जिल्ह्यात चाळीस बायका सती गेल्याचा उल्लेख या डायरीत आहे. सतीबंदींसाठी आयुष्य वेचलेले राजा राममोहन राय १७७४ साली जन्मले म्हणजे त्यांच्या जन्मानंतर ४४ वर्षे झाली तरी महाराष्ट्रात सतीची प्रथा सुरूच होती. या अनिष्ट रूढीविरुद्ध महाराष्ट्रात पहिला आवाज उठवणारा विचारवंत म्हणजे बाळशास्त्री. अनुभवशून्य ग्रंथप्रामाण्यातून बाहेर पडा, अशी हाक देणारे आणि आपल्या शतपत्रातून कोरड्या रूढींवर आसूड ओढणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख मूळ पावसचे.
महाराष्ट्राला विवेकयुगाची ओळख करून देण्याचा प्रारंभ आपल्या रत्नभूमीने केला याचा अभिमान वाटतो. बाळशास्त्रींपासून सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरूच आहे.
आपले साहित्य संमेलन हे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची फार मोठी परंपरा मराठी साहित्य विश्वाला आहे. यावर्षीचे साहित्य संमेलन वर्धा इथे झाले. वर्धा ही विनोबाजींची भूमी. कोकणात जन्मलेल्या विनोबाजींनी विदर्भात चिरसमाधी घेतली. साधी, सरळ आणि निरलंकृत मराठी भाषा हवी असेल तर विनोबाजींची पुस्तके वाचायला हवीत. गेल्या काही वर्षांत ही अ. भा. मराठी साहित्य संमेलने साहित्यचर्चेपेक्षा वादचर्चेनेच गाजताहेत आणि हे वादही साहित्यबाह्य विचारातून निर्माण केले जात आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनात आम्ही त्याचा चांगलाच अनुभव घेतलाय. अशा वेळी या वादांच्या पल्याड जाऊन परिसरातल्या साहित्यप्रेमींनी एकत्र येऊन साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण साहित्य संमेलने होणे ही गरजेची गोष्ट आहे. अशा संमेलनातून व्याकरणविषयक चर्चा कदाचित होत नसतील. नसतील ‘जागतिक आर्थिक मंदी आणि मराठी भाषेवर होणारे परिणाम’ असले जडजंबाल परिसंवाद. मला ती प्राध्यापकाची गोष्ट आठवते. हे प्राध्यापक सतत साहित्यिक क्लिष्ट विषयांवर कुठल्याशा न खपणाऱ्या आणि वर्तुळातच चर्चा करण्यात धन्यता मानणाऱ्या नियतकालिकांत लेख लिहीत असतात. त्यांच्या घरात पत्नी आणि लहान बाळ असा छोटासा संसार असतो. हे महाशय लिहिण्यात मग्न असतात आणि अचानक बाळ रडायला लागते. प्राध्यापकांची पत्नी स्वयंपाक करत असते. ती म्हणते ‘अहो जरा बाळाला शांत करा’ हे विचारवंत बाळाला घेऊन गॅलरीत येतात. जोजवायचा प्रयत्न करतात. बाळ काही थांबत नाही. पत्नी आतून सांगते, त्याला चंद्र, चांदण्या दाखवा म्हणजे रमेल. प्राध्यापकांनी बाळाला चंद्र दाखवला. ते बाळाला सांगू लागले ‘ बाळ हा बघ चंद्र! चंद्र हा स्वयंप्रकाशित नसतो. पृथ्वीला जसा चंद्र हा उपग्रह आहे ना, तसेच आकाशतल्या ग्रहांनासुद्धा उपग्रह असतात. तो बघ… तो दिसतोय ना? तो मंगळ आहे.’ पण बाळ रडायचे थांबत नाही. बहुधा तो मंगळ या प्राध्यापकांच्या राशीला आला असावा. बाळाचा रडण्याचा आवाज थांबत नाही, हे बघून बाळाची आई स्वयंपाक तसाच ठेवून बाहेर गॅलरीत आली. तिने बाळाला घेतले आणि बाळाला चंद्र दाखवून म्हणू लागली, ‘ चांदोबा चांदोबा भागलास का । लिंबोणीच्या झाडामागे लपलास का । लिंबोणीचं झाड करवंदी । मामाचा वाडा चिरेबंदी’ तो बघ चांदोमामा हसतोय.. बाळाकडे बघतोय…बाळ रडायचे थांबून चांदोमामा बघायला लागते. ते हसायला लागते. प्राध्यापकी बोजड भाषेवर साध्यासुध्या, घरगुती, ममतेच्या शब्दांनी सहज मात केल्याचे हे उदाहरण! इथल्या उपस्थित माताभगिनी नक्कीच आपल्या बाळाला रडण्यापासून असेच थांबवत असतील. ग्रामीण साहित्य अशीच मनाला आल्हादकता देण्याचे काम करते.
मित्रांनो,
साहित्याच्या अनेक व्याख्यानांमध्ये 'सहित येते ते साहित्य' अशी साहित्याची साधी आणि सोपी सुटसुटीत ब्याख्या आहे. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरच आपले आयुष्य झुलत असते. हीच सुखदु:खे साहित्यिक आपल्या लेखनातून समाजापर्यंत पोहोचवत असतो. कुणी आपल्या आयुष्यातली दुःखे व्यक्त करतो तर कुणी त्या वेदना खोलवर तशाच ठेवून जगाला आनंद देण्यासाठी लेखणी उचलतो. बहिणाबाई चौधरी म्हणतात माझं दुःख माझं दुःख तयघरात कोंडलं माझं सुख माझं सुख हंड्याझुंबर टांगलं प्राचीन वाङ्मयात लेखनाचा शेवट दुःखात्म नसावा अशी धारणा होती. अर्वाचीन लेखनात ही विचारधारा नाकारून दलित लेखकांनी आपल्या तप्त दुःखांना वाट करून दिली. पांढरपेशा समाजाला झडझडून जाग यावी आणि वास्तवाचे भान यावे अशी, ही रसरशीत भाषा होती. अण्णाभाऊ साठ्यांनी ' माकडीचा माळ'मधून वंचित आणि उपेक्षित समाजातली व्यक्तिचित्रे लिहून गावकुसाबाहेरचे विश्व दाखवले. आपल्या कोकणातल्या माधव कोंडविलकर, उर्मिला पवार यांची आत्मचरित्रे कोकणातल्या दलितांच्या व्यथांना वाचा फोडणाऱ्या आहेत. प्रादेशिक वाङ्मयात भवतालाच्या कथाव्यथा व्यक्त करणारे साहित्य अनेकांनी लिहिलेय. व्यंकटेश माडगूळकर,गदिमा, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्याबरोबर या कोकणभूमीतील लेखकांचेही मोठे योगदान आहे. जयवंत दळवी, खानोलकर, मधू मंगेश कर्णिक आदींनी तळकोकणाला तर श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर इत्यादींनी उत्तर कोकणाला शब्दांकित केले. कवी माधवांचीहिरवे तळकोकण’ ही तर अजरामर कविता आहे.
माणूस नेहमीच दोन जगांत वावरत असतो. एक नैसर्गिक आणि दुसरे असते सांस्कृतिक. निसर्ग हा मानवी इच्छाआकांक्षा यांच्या पलीकडे असतो. सांस्कृतिक विश्व हे मानव निर्मित असते. या दोन विश्वातले बंध हे युगानुयुगांचे आहेत. निसर्ग माणसाला शोध घेण्याची प्रेरणा देतो. माणूस त्यातून आपले विश्व घडवत असतो. मोहेन जो दडो आणि हडप्पा संस्कृतीतला मानव आपले विश्व निर्माण करत होता. उत्तम घरे, वस्तू निर्माण करत होता. निसर्गाने दिलेल्या नद्यांच्या जलावर धान्य पिकवत होता. निसर्गानेच आपला क्रम बदलला. या महान शहरांकडे विन्मुख होऊन नद्यांनी प्रवाह बदलले. भयाण दुष्काळ आला. जनजीवन उद्ध्वस्त झाले. शहरे ओसाड झाली, पण म्हणून माणूस थांबला का? त्याने नव्याने शोध घेतला. भूमी बदलली. सिंधू, सरस्वतीच्या काठावरून गंगा-यमुनांच्या तीरावर आला. निसर्गाच्या प्रकोपावर मात करून नवीन सांस्कृतिक विश्व निर्माण केले. याच तीरावर रामायण, महाभारतासारख्या साहित्यकृती जन्माला आल्या.
अगदी अलीकडे २०२१ ला चिपळूणला महापूर आला. शहर जलमय झाले. सर्वत्र कंबरभर चिखलापलीकडे दिसत नव्हते. निसर्गाने प्रकोपाच्या माध्यमातून झटका दिला. वाटत होते, आता चिपळूण संपले. जिथे १९९२ साली पहिले कोकण मराठी नाट्यसंमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, बोलीभाषा संमेलन, लेखक प्रकाशक संमेलन अशी अनेक संमेलने झाली, तेथे आता काय? पण दोनच दिवसांपूर्वी ५ ते ८ फेब्रुवारीला संपूर्ण कोकणातील कलाकारांच्या लोककलांचा भव्य महोत्सव चिपळूणला साजरा झाला. ज्या वाशिष्ठीचा प्रकोप झाला, तीच वाशिष्ठी खळाळल्या जलाने हा आनंद सोहळा निरखत होती. तीच नदी आणि तीच माणसे. निसर्ग आणि सांस्कृतिक जीवन असे हातात हात घालून अनंतकाळ मार्गक्रमण करते आहे. साहित्यकृती सौंदर्याचा प्रत्यय देते तर निसर्ग समजून घ्यायला शिकवतो. आज दोन्हीवर भोगवादाने अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. जागतिकीकरण, प्रसारमाध्यमांचा अतिरेक, इंग्रजीचे वाढते प्रस्थ यामुळे आपण आपल्या प्राचीन संस्कृतीपासून, आपल्या मातृभाषेपासून दूर होत चाललोय. पूर्वी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातून गोव्यात गेलेल्या मराठी शिक्षकांनी मोलाचा सहभाग घेतला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे हे त्यापैकीच एक होते. गोव्यात मराठी शाळा गावोगावी होत्या. आज मात्र हाताच्या बोटावर मोजायलाही मराठी शाळा शिल्लक नाहीत. तोच प्रकार बृहन्महाराष्ट्रात आहे. गुजरात, मध्य प्रदेशात, कर्नाटकात कशाला, खुद्द मुंबईतल्या मराठी शाळा बंद पडल्या. ‘माझा बावा कसा फाड फाड विंग्रजी बोलताय’ हे सांगताना खेड्यापाड्यातली माता गावोगावी दिसते आहे. अशा वेळी क्षणभर मनात येते ‘मराठींचे अस्तित्वच धोक्यात येते आहे की काय? ‘ पूर्वी मराठी माध्यमाच्या शाळेतच प्राथमिक शिक्षण घेतलेले अनेक दिग्गज पुढे इंग्रजीतही विश्वमान्य ठरले होते. गोपाळकृष्ण गोखले यांचे प्राथमिक शिक्षण ताम्हनमळ्याच्या मराठी शाळेतच झाले होते. पुढे इंग्रजी शिकले. इंग्लंडमध्ये त्यांची व्याख्याने ऐकायला इंग्रज मोठ्या संख्येने यायचे. कारण त्यांचे इंग्रजी भाषेवरचे विलक्षण प्रभुत्व चकीत करणारे होते. आजकाल चित्रवाहिन्यांवरची मराठी भाषा ही चिंता करावी, अशी होते आहे. अनेक उदाहरणे देता येतील. उत्तर भारतात जशी ‘बंबईया हिंदी’ म्हणून मुंबईतल्या भ्रष्ट हिंदीची चेष्टा होते, तशी वाहिन्यांवरच्या मराठीची होत आहे.
यापुढे मराठीची ध्वजा हाती घेऊन आपल्यालाच वाटचाल करायची आहे. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन विश्वात मराठीही काहीशी दुर्लक्षित होत चालली आहे. वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कला शाखेत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात किती कमी आहे, हे पाहिले तर वास्तवाचे भान येईल. मराठी विषय घेऊन पदवी मिळाली तर उपजीविकेसाठी नोकरी नाही. हे चिंताजनक आहे.
मला आणखी एक भीती वाटते, आपल्या लोकभाषा संपतील की काय? शिकलेल्या माणसांना आता आपली परंपरागत लोकभाषा बोलताना लाज वाटू लागली आहे. प्रमाणभाषेत बोललो तर आपण पुढारलेले होतो, अशी काहीशी भावना निर्माण झाली आहे. आमच्या भागात बोलली जाणारी तिलोरी कुणबी बोली काही वर्षांत संपेल, असे वाटू लागले आहे. पण प्रमाण बोली समृद्ध झाली आहे, ती अशा प्रादेशिक बोलींच्याच बळावर. व्यंकटेशस्तोत्रात म्हटले आहे,
गावीचे होते लेंड ओहोळ । गंगेसी मिळता गंगाजळ
कागविष्ठेचे झाले पिंपळ । तयासी निंद्य कोण म्हणे?
प्रादेशिक भाषेच्या ओहळातून आलेल्या जलौघातूनच प्रमाणभाषेचा महासागर निर्माण झालाय. त्यामुळे यापुढे आपली लोकभाषा बोलताना लाज वाटू देऊ नका.
जोपर्यंत घरोघरी एखादा तरी तुकोबांचा अभंग गायिला जातोय, कुठेतरी राऊळात हरिपाठाचा गजर होतोय, तोपर्यंत मराठीला मरण नाही.
चक्रधरांपासून साऱ्या संतांनी मायमराठीतच विचार व्यक्त केले. आपणही कुठल्या कार्यालयात गेल्यावर निर्भयपणे मराठीच बोलू या! मराठीतच शिकू या आणि शिकवू या. आपण या देशाचे आधारस्तंभ आहोत.
सेनापती बापटांनी म्हटलेय
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा
या महाराष्ट्र ‘भू’ची संस्कृती सांगणारी मराठी भाषा आपण सर्वतोपरी जपण्याचा निर्धार करू या.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
- प्रकाश देशपांडे, चिपळूण

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


One comment