संगीत मेघमल्हार – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १५ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मेघमल्हार हे नाटक सांगलीतील संस्था सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था :

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली

चिपळूणचे माजी आमदार राजाराम शिंदे मुंबईत १३ ऑगस्ट १९६७ रोजी शिवाजी मंदिर येथे झालेल्या मेघमल्हार नाटकाचे पहिल्या प्रयोगाचे निर्माते होते. पहिल्या प्रयोगाचे दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांनी केले होते. संगीतभूषण पं. राम मराठे, पं. वसंतराव देशपांडे, आशा पोतदार अशा दिग्गज कलाकारांनी नाटकात भूमिका केल्या होत्या. तलत महंमद, आशालता वाबगावकर आणि कान्होपात्रा यांनी पार्श्वगायन केले होते. आपल्या गायकीतून लीलया खटक्याच्या आणि इतर ताना घेणारे रामभाऊ मराठे यांनी या नाटकाला संगीत दिले होते.

‘कल्याण संगीत विद्या मंदिर’ या व्यावसायिक वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या संगीत क्लासचा संचालक कल्याण, फॅशनेबल युवती रंजना, लक्षाधीश असलेले रसिक दादासाहेब इनामदार, त्यांची मुलगी ललिता, “आपलं संगीत म्हणजे सप्तसुरांचा सागर घुसळून तपस्वी गायकांनी मिळविलेलं अमृत…” असे भारतीय संगीताबद्दल ज्याचे मत आहे, तो प्रख्यात गायन-उस्तादाचा शिष्य श्याम, दर्जा नसलेल्या एका साप्ताहिकाचा मालक-संपादक बाजीराव कोलदांडे अशी मोजकी पात्रे या नाटकात आहेत. श्यामला अभिजात संगीत आवडते आणि पैशांसाठी कलावंतांनी आपल्या कलेचा बाजार मांडू नये, असे वाटते. परंतु त्याचा मित्र कल्याण पैशाकरिता स्वत:कडे कमीपणा घेऊन गणेशोत्सव, दुर्गोत्सव अशा विविध उत्सवांमध्ये कार्यक्रम करण्याची तयारी ठेवतो. एका कार्यक्रमानंतर गायक श्यामला बिदागी म्हणून फक्त नारळ मिळतो. तेव्हा कल्याणने श्यामला विचारले की, तू बिदागी का मागितली नाहीस? त्यावर श्याम म्हणाला, स्वत:हून कशी मागणार? कल्याण म्हणतो, परमेश्वरालादेखील आधी घंटी बडवून जागं करावं लागतं आणि नंतर त्याच्याकडे सुख, मागणी करावी लागते. या जगात नेहमी मागणी पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चे, संप करावे लागतात. दुसऱ्या एका प्रवेशात श्याम हा कल्याणला म्हणतो, या दांभिक दुनियेत तुझ्यासारख्या सज्जनालादेखील पडती बाजू घ्यावी लागते आहे. देवमाणसालादेखील सैतानाशी तडजोड करावी लागते आहे. कारण येथे धोपटमार्गाने जाणारे धोपटले जात आहेत आणि तेजस्वी हिरे कोळसे म्हणून जाळले जाताहेत.

अशा व्यवहारवादी आणि सार्वजनिक मानवी जीवनातील वास्तव सांगताना नाटककार गोखले त्रिकालाबाधित सत्यसदृश अनेक वाक्ये देऊन जातात. अनेक वाक्ये उपमा-अलंकारांनी अलंकृत आहेत. त्यामुळे नाटकातील संवाद दर्जेदार आणि परिणामकारक झालेले आहेत. त्यात अतिशय उत्तम काव्य असलेली नाट्यगीतेही आहेत.

नादब्रह्माचा सच्चा उपासक बनून गुरुवर्य रामदयाल यांच्या नावाचा नि भारतीय संगीताचा झेंडा त्रिखंडात उभारणे हे माझे ध्येय आहे, असे श्याम म्हणून जातो, तेव्हा अस्सल शास्त्रीय गायकाची जबाबदारी आणि संगीतोपासनाच अधोरेखित होते. विद्याधर गोखले यांचे हे पहिले सामाजिक संगीत नाटक होते. विद्याधर गोखले यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आदरांजली वाहण्यासाठी या नाटकाचा प्रयोग साकारण्यात आहे.

श्रेयनामावली
लेखक : विद्याधर गोखले
मूळ संगीत : पं. राम मराठे
संगीत दिग्दर्शन : प्रा. शरद बापट
दिग्दर्शक : चंद्रकांत धामणीकर
सूत्रधार : डॉ. शरद कराळे
व्यवस्थापक : विलास गुपेत
साथसंगत –
ऑर्गन : भास्कर पेठे
तबला : परेश पेठे
व्हायोलीन : राजेंद्र भावे

कलावंत
अभिषेक काळे
सागर आपटे
धनश्री गाडगीळ
मयूरेश पाटील
मुक्ता कुलकर्णी
मयूर पाटील
चंद्रकांत धामणीकर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply