कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानाचे गोपालन आदर्शवत असून या मठाच्या धर्तीवर कोकणात गोशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
कणेरी मठ येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसांच्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा समारोप आज श्री. राणे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रेय होसबाळे होते.
श्री. राणे म्हणाले, कणेरी मठाने आयोजित केलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होईल. मठाचा हा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे. या मठाद्वारे निरपेक्ष वृत्तीने अनेक देशविधायक कामे झाली आहेत. या महोत्सवाद्वारे प्रदूषण जागृतीबाबत उल्लेखनीय कार्य झाले असून या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्यांनी झोकून देऊन काम केले आहे.
दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, पृथ्वीसोबत आपला व्यवहार कसा आहे, याचे सर्वांनी अंतर्मुख होऊन अवलोकन करावे. प्रत्येकाने निसर्गानुरूप जीवनशैलीचा अंगीकार करावा. सुखी जीवनासाठी पंचमहाभूत तत्त्वाला अनुसरून आचरण करावे. भविष्यातील धोका ओळखून पर्यावरण जागृतीचा संदेश या महोत्सवाद्वारे देशात किंबहुना जगात जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी, कर्नाटक विधान परिषद सभापती बसवराज होराठी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार महेश शिंदे, शशिकला जोल्ले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आदी उपस्थित होते. समारोप समारंभाला कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

