कोकणात एक कोटी झाडे लावण्याचा रवींद्र प्रभुदेसाई यांचा मानस

ठाणे : पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आगामी काळात पितांबरीच्या माध्यमातून एक कोटी झाडे लावण्याचा मानस पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ मराठी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला. त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाण्यातील आयलीफ रिट्स बँक्वेट सभागृहात श्री. प्रभुदेसाई यांच्या साठाव्या वाढदिवसाचा समारंभ ३ मार्च रोजी पार पडला. मराठी उद्योजक म्हणून गेली ३४ वर्षे राज्याच्या उद्योग क्षेत्रात प्रभुदेसाई यांचे मोठे योगदान आहे. याच अनुषंगाने ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्‍यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आणि त्यांचा ६० वर्षांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. त्यावेळी बोलताना श्री. प्रभुदेसाई म्हणाले की, कोकणात पर्यावरणपूरक काम करण्यासाठी पितांबरीच्या माध्यमातून सात लाख वृक्षलागवड केली असून भविष्यात एक कोटी झाडे लावण्याचा मानस आहे.

गेली अनेक वर्षे श्री. प्रभुदेसाई वाढदिवसानिमित्त स्वतःच्या वयाइतक्या रकमेची देणगी काही सामाजिक संस्थांना देतात. त्यानुसार यावर्षीही साठाव्या वाढदिवसानिमित्त १२ वर्षे आणि त्याहीपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांना त्यांनी प्रत्येकी ६० हजार रुपयांचा धनादेश दिला. वाढदिवसानिमित्त पितांबरीचेच उत्पादन असलेली रुचियाना गूळ पावडर दान करण्याच्या उद्देशाने त्यांची तुला करण्यात आली.

या सोहळ्यात प्रभुदेसाई यांच्या कुटुंबीयांसोबतच सॅटर्डे क्लब, उद्योग अनुभव प्रतिष्ठान, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, बिझनेस फोरम या संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाणे शहरातील संघ परिवार, कलाकार, सामाजिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी प्रभुदेसाई यांच्यावर तयार करण्यात आलेला माहितीपट दाखवण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply