अक्षरमित्र, माहेर संस्थेतही पुस्तकांची गुढी

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाने गेल्या चार वर्षांपासून चालविलेल्या पुस्तकांच्या गुढीचा उपक्रम आता ठिकठिकाणी राबविला जात आहे. जुवाठी (राजापूर) येथील अक्षरमित्र संस्था आणि हातखंबा येथील माहेर संस्थेतही आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.

जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची गुढी उभी केली.

गावातील वयोवृद्ध विधावामाता निरंजनी मयेकर आणि चंद्रभागा मयेकर यांनी पुस्तकांच्या गुढीसमोर दीपप्रज्वलन केले. तसेच गुढीला पुष्पहार अर्पण केला. उपस्थित महिला आणि विद्यार्थिनींनीही पुस्तकांच्या गुढीचे पूजन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली.

राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा अधिक प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी पाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी या वेगळ्या उपक्रमाचे छोटेखानी आयोजन केले होते. विधवा मातांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि या उपक्रमाची सुरुवात अशा छोट्या कार्यक्रमातून आपल्याकडूनच व्हावी, याच भावनेतून या गुढीचे पूजन आपल्या गावातील विधवा मातांच्या हस्ते केले, असे श्री. गोंडाळ यांनी सांगितले.

या उपक्रमाला त्यांची पत्नी सौ. मालती गोंडाळ यांची उत्तम साथ मिळाली.

माहेर संस्थेतील गुढी

हातखंबा येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेतही पुस्तकांची गुढी उभारून सणाचे महत्त्व जपण्यात आले. संस्थेत वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. यावर्षी गुढीपाडवा हा सणदेखील उत्साहाने पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.

ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांना वाचणे, माहिती करून घेणे फार गरजेचे आहे. त्यानिमित्ताने पुस्तकांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय नववर्षाच्या दिनानिमित्त पुस्तकरूपी गुढी उभारण्यात आली. संस्थेतील प्रवेशितांना पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेने साकारण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply