मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने माटुंगा येथील येथील व्हीजेटीआयमध्ये सलग १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. आंबेडकर त्यांच्या विद्यार्थी जीवनात आणि नंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यात दररोज १८ तास अभ्यास करायचे. संस्थेतील विद्यार्थांनीसुद्धा बाबासाहेबांप्रमाणे १८ तास अभ्यास करून जयंती साजरी करून हे अभियान यशस्वी केले. बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच, बाबासाहेबांनी मानवतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या अपार कष्टांची आठवण करणे हा अभियानाचा उद्देश होता.
बाबासाहेब समजून घेताना, त्यांनी केलेल्या कष्टांची अनुभूती घेताना, आपणही स्व-निश्चयाने १८ तास सलग अभ्यास करून जयंती साजरी करायची, असे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठरवले. या अभ्यासकाळात विद्यार्थ्यांना पुस्तके, चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संस्था संचालक तसेच प्रशासनाचे विशेष मार्गदर्शन लाभले.
अभियान यशस्वी करण्यात डॉ. वाल्मीक निकम, डॉ. विनोद सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. के. के. सांगळे आणि इतर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान होते. ग्रंथालय कर्मचारी संजय कांबळे, प्रकाश शिंदे, शिवानी शेट्ये तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांना सेवा दिली.



