जगाला हेवा वाटेल असे स्मारक आंबडवे येथे उभारणार : उदय सामंत

आंबडवे (ता. मंडणगड) : जगाला हेवा वाटेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आंबडवे येथे उभारले जाईल. त्यामुळे आगामी काळात चैत्यभूमीप्रमाणेच लाखो आंबेडकरी अनुयायी येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी खात्री पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आज बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जयंतीचा भव्य कार्यक्रम करण्याचे आणि त्यासाठी नियोजन आणि आवश्यक ते सर्व प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने कार्यरत आहोत. बाबासाहेबांचा विचार जिल्ह्यात सर्व जनतेपर्यंत पोहोचावा, याकरिता आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करू या. राज्य सरकार आपल्यामागे ठामपणे उभे आहे. आंबडवे येथील स्मारक आणि महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांकरिता कुलगुरूंसह सर्व संबंधितांना आंबडवे येथे आणून सर्व प्रश्न पुढील महिन्याभरात मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक आंबडवे येथे उभे करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्रपुरुषांचे चरित्र पुस्तकरूपाने पोहोचावे, याकरिता आवश्यक ती सर्व शासकीय यंत्रणा उभी करणार असल्याचे यावेळी सांगितले.

शासनाच्या वतीने आंबडवे येथे झालेल्या पहिल्या जयंती कार्यक्रमाचा एक घटक होण्याचा सन्मान मिळणे हाच माझा सत्कार आणि गौरव असल्याचे सांगून हा ऐतिहासिक दिवस नेहमीच स्मरणात राहील, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी आमदार योगेश कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजश्री गायकवाड, प्रांत अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार संजय भिसे, विभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, समाजकल्याण सहआयुक्त यादव गायकवाड, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, सुदर्शन सकपाळ, सुदाम सकपाळ, रमेश दळवी, प्रताप घोसाळकर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मंडणगडच्या तहसीलदार कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते.


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply