रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबू म्हाप, अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगरसेवक राजू तोडणकर, सुशांत चवंडे, श्रीमती करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्यवीर ही आपली शक्तिस्थाने आहेत. एक ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी केलेल्या घोषणेनुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुशोभीकरणाचे जास्तीत जास्त काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. सुशोभीकरण पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील याबाबत आदेश काढण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.’
‘रत्नागिरीमध्ये 100 वर्षं जुने लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय असून, या ग्रंथालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास येत आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रत्नागिरीतील विमानतळाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव देण्याबाबतच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कोकणातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजला लोकनेते श्यामराव पेजे यांचे नाव देण्यात येणार आहे,’ असे या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्याला सहा भारतरत्ने लाभली आहेत. या भारतरत्नांचे कार्य देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना, तसेच पुढच्या पिढीला कळावे, याकरिता एक वेगळे उद्यान रत्नागिरीमध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचेही या वेळी सामंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उदय सामंत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले. या वेळी अॅड. दीपक पटवर्धन व राहुल पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले.
रहाटाघर बसस्थानकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील रहाटाघर बसस्थानकाचे डांबरीकरण व सुशोभीकरण या कामांचे भूमिपूजनही उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.



