आरवलीच्या श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव २५ एप्रिलपासून

आरवली : आरवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव वैशाख शुद्ध पंचमी ते सप्तमी (२५ ते २७ एप्रिल २०२३) या कालावधीत होणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

आरवली येथील श्री देव आदित्यनारायण अर्थात सूर्यदेवाच्या मंदिराची स्थापना शके १८३०मध्ये झालेली आहे. या मंदिरात दर वर्षी वर्धापनदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवकाळात दररोज सकाळी श्रींची षोडशोपचार पूजा, लघुसौर व सौर एकादष्णी, तसेच लघुसौर हे धार्मिक विधी केले जाणार आहेत. त्यानंतर आरती मंत्रपुष्पांजली होऊन दुपारी तीर्थप्रसाद होईल.

पहिल्या दिवशी सकाळी सहस्रावर्तने होणार असून, संध्याकाळी चार ते सहा या वेळेत हळदीकुंकू होणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत मुलांच्या स्पर्धा होणार असून, संध्याकाळी पाच ते सात या वेळेत ग्रामस्थांचे भजन होईल. उत्सवाच्या पहिल्या दोन दिवशी रात्री नऊ ते ११ या वेळेत आरती, मंत्रपुष्पांजली आणि छबिना, तसेच रात्री ११.३० ते १.३० या वेळेत ह. भ. प. दिगंबरबुवा नाईक (नागपूर) यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवाच्या अखेरच्या दिवशी, गुरुवारी रात्री १० ते १ या वेळेत आरती, मंत्रपुष्पांजली आणि छबिना होणार असून, मध्यरात्री दीड ते पहाटे साडेतीन या वेळेत विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील. लळिताचे कीर्तन शुक्रवारी (२८ एप्रिल) पहाटे चार ते साडेसहा या वेळेत होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांसोबतच उत्सवानिमित्त विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. सात ते बारा वर्षं वयोगटासाठी सूर्यस्तुती पाठांतर स्पर्धा, तसंच ‘कथा क्रांतिकारकांच्या’ या विषयावर कथाकथन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, ‘संस्कार – शक्ती की बेड्या?’ या विषयावर निबंध लिहायचा आहे.

खुल्या वयोगटासाठी ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ‘श्री देव आदित्यनारायण उत्सव – आठवणी, किस्से आणि बरंच काही’ या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ करायचा आहे. हे व्हिडिओ २२ एप्रिल २०२३ पर्यंत 9421929074 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पराग गजानन लघाटे यांच्याकडे पाठवायचे आहेत. स्पर्धेतील निवडक सर्वोत्तम ध्वनिचित्रफिती उत्सवात दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

उत्सवकाळात तिन्ही दिवस सकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत सामूहिक सूर्यनमस्कार सेवा केली जाणार आहे.

संपूर्ण उत्सवात सकाळी अल्पोपाहार, दुपारी भोजन आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था मंदिरात करण्यात आली असून, त्याचा खर्च विविध भक्तांनी उचलला आहे. उत्सवाच्या अखेरच्या दिवशी (२७ एप्रिल) दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत महाप्रसाद होणार आहे.

संपूर्ण उत्सवात भक्तांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव आदित्यनारायण देवस्थान समितीतर्फे अध्यक्ष संतोष शरद रानडे (8007425199), चिटणीस अनिरुद्ध विजय पाटणकर (8411807367) आणि खजिनदार हर्षल दिगंबर पाटणकर (9420763542) यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply