रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरचा चिपळूणजवळचा परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. (पर्यायी मार्गाचा नकाशा बातमीच्या शेवटी दिला आहे.)
पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या परशुराम घाटामधल्या १.२० किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण उंच डोंगररांगा व खोल दऱ्यांमुळे अवघड स्वरूपाचे आहे. यातील चौथ्या टप्प्याचे काम अवघड स्वरूपाचे असल्याने त्या ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेल्या मातीमुळे खाली महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व पुढील संभाव्य जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांचे संयुक्तपणे निरीक्षण असेल.
बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण मार्गे वळविण्याबाबतची कार्यवाही करताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्या अशा –
- परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवणे व बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण मार्गे वळविण्याबाबतची कार्यवाही उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करावी.
- परशुराम घाटात दरड प्रवणग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्निशामक वाहन, इत्यादी आवश्यक साधनसामग्री व जबाबदार अधिकारी यांच्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचाव कार्यासाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांची राहील.
- रस्त्याच्या बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक राहील.
- परशुराम घाटातील वाहतूक कोणत्या वेळी वाहतुकीसाठी खुली अगर बंद राहणार आहे याबाबत घाटाच्या सुरुवातीस व घाटाच्या शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावावेत व त्याबाबत स्थानिक भागात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्याची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तरीत्या करायची आहे.
- परशुराम घाटातील वाहतूक कोणत्या वेळी वाहतुकीसाठी खुली अगर बंद राहणार आहे याबाबत पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा, व कोल्हापूर या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी दयावी व परशुराम घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईवरून येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेलवरून मुंबई-पुणे महामार्गावरून, तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली, जि. रत्नागिरी येथून रत्नागिरी-कोल्हापूर-मुंबई या मार्गे वळवण्यात यावीत, या दृष्टीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना करावी.
- या आदेशात नमूद केलेला कालावधी व वेळेत परशुराम घाटातील वाहनांच्या वाहतुकीबाबत सर्वतोपरी सुरक्षिततेसह सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-रायगड व रत्नागिरी यांची संयुक्तपणे राहील.
परशुराम घाटातील वाहतूक थांबविल्यास त्या ठिकाणी थांबलेल्या वाहनधारकांकडून रोष व्यक्त होण्याची शक्यता राहते. त्यामुळे घाटात सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने दोन्ही विभागांनी किमान उप अभियंता दर्जाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
- या घाटामध्ये वाहतूक बंद अगर सुरू असल्याच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग विभाग व त्यांच्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी 24 तास लक्ष ठेवणे आवश्यक राहील.
- परशुराम घाटातील दरडप्रवण क्षेत्रामध्ये मुंबई-पुणे महामार्गावरील घाटामध्ये करण्यात आलेल्या फेन्सिंगसारखे फेन्सिंग तात्काळ करावे.
- घाटामध्ये संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे.
- हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असलेल्या पर्यायी मार्गावरील साइड पट्टीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पर्यायी मार्गावरील सुरक्षित ठिकाणी जेसीबी, पोकलेन, क्रेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्निशामक वाहन इत्यादी आवश्यक साधनसामग्री व जबाबदार अधिकारी यांच्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचावकार्यासाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांची संयुक्तपणे राहील.
- बंदी कालावधीतील वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी, यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम ११६प्रमाणे वाहतुकीची चिन्हे व फलक उभारण्याची कार्यवाही कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी वाहतूक पोलीस व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मदतीने करायची आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(सोबतच्या चित्रात पर्यायी मार्ग दर्शवला आहे.)


