रत्नागिरी जिल्हा भाजपचा विजय संकल्प मेळावा रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. शत प्रतिशत भाजपचा नारा त्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने दिला आहे. भाजपची मानसिकता असलेल्या काही ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचांनी काही ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविल्याचा उल्लेख यावेळी झाला. लवकरच होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी या मेळाव्यात संकल्प करण्यात आला.
राजकीय पक्षाची वाढ व्हावी, यासाठी असे मेळावे घ्यावे लागतात. कोणीतरी वरिष्ठ म्हणजे राज्य किंवा देशपातळीवरचा नेता मेळाव्यासाठी यावा लागतो. त्याने कानमंत्र द्यावा लागतो, तर पक्षाची सारी यंत्रणा कामाला लागते. कोणत्याही राजकीय पक्षाचे हेच सूत्र आहे. अनेक स्थानिक नेते पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यामुळे बळ मिळते. भारतीय जनता पक्षाने मध्यंतरीच्या काळात पक्षाच्या वाढीसाठी तसे फारसे प्रयत्न केलेले नव्हते किंबहुना केलेले प्रयत्न फारच तोकडे आणि मर्यादित स्वरूपाचे होते. आठ-दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्वरूपाचे भाजपचे मेळावे होऊ लागले आहेत. रत्नागिरीतील विजय संकल्प मेळावा त्यातीलच एक होता.
रत्नागिरीच्या मेळाव्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी स्वप्ने दाखविण्यात आली आहेत. त्यांनी सर्वत्र विजय मिळवण्यासाठी संकल्प करावा, असे त्यांना सूचित करण्यात आले आहे, पण गेल्या २०-२२ वर्षांपासून जिल्ह्यात भाजपला एकही आमदारपद मिळू शकलेले नाही. खासदारपद तर पक्षाला कधीच मिळाले नव्हते, पण दौऱ्यावर आलेले स्थानिक, राज्य आणि केंद्र स्तरावरील भाजपचे नेते पुढचा खासदार भाजपचा असेल, असेच सांगत आहेत. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेशी युती झाल्यानंतर त्या दृष्टीने काही हालचाली झाल्या आहेत का, कोणती चर्चा झाली आहे का, या प्रश्नाचे जाहीर उत्तर मिळालेले नाही. शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.
आमदार-खासदारकी मिळाली नाही तर राज्य आणि केंद्रात आपले प्रश्न मांडता येत नाहीत, येणार नाहीत, अशी कार्यकर्त्यांची धारणा आणि भावना आहे. मेळाव्याने प्रयत्न करण्याची दिशा दिली आहे, पण खासदार आणि आमदारकीच्या उमेदवारीचे लक्ष्य मात्र पूर्णपणे धूसर आहे. अशा स्थितीत कार्यकर्ते कसे काम करणार आणि पक्षाला यश कसे मिळवून देणार, हा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना लक्ष्यनिश्चिती दिसल्याशिवाय त्यांच्या प्रयत्नांना बळ येणार नाही. शिवसेना गावागावामध्ये वाड्यावस्त्यांवर पोहोचली आहे. त्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवरचा भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. त्यामुळेच भाजपला अत्यंत मर्यादित स्वरूपात यश मिळते. कार्यकर्त्यांना आमदार-खासदारकीचे स्वप्न दाखवून उपयोगी नाही. त्यादृष्टीने पडलेली आश्वासक पावले त्यांना दिसली पाहिजेत. अन्यथा अशा विजय संकल्प मेळाव्यांचा काहीही उपयोग होणार नाही. आणखी एक म्हणजे केवळ निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कामाला लावून चालणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे विधायक कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कार्यकर्ते कोठे कमी पडतात, याचाही आढावा घ्यावा लागेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ एप्रिल २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – २१ एप्रिल २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia21april
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?
https://kokanmedia.in/2023/04/21/skmeditorial21april/
मुखपृष्ठकथा : ऐतिहासिक सागरी सैर : एक स्वप्नरंजन : डहाणूतील शशिकांत काळे यांचा लेख
अजितदादा पवार यांची अस्वस्थता : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख
मित्र आणि मैत्री : मुरबाड येथील यशवंत सुरोशे यांचा ललित लेख…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

