रत्नागिरीत ३० एप्रिलला नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या ३० एप्रिल रोजी नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा होणार आहे.

येथील आर्ट सर्कलतर्फे गेली चार वर्षे नलिनी प्रताप कानविंदे स्मृती सुगम संगीत आणि संगीत रचना स्पर्धा घेण्यात आली. नवीन वैविध्यपूर्ण रचनांसह महाराष्ट्रभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये नावीन्य आणण्याच्या हेतूने यंदा प्रथमच नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची पात्रता ऑनलाइन पद्धतीने घेऊन त्यातून १० उत्कृष्ट गझलगायक निवडण्यात आले आहेत. अंतिम फेरीसाठी प्रेमराज आंदलगावकर (पुणे), प्रवीण देशमुख (पुणे), रूपाली विघरे (पुणे), धीरेश काणेकर (कणकवली), आसावरी निगुडकर (रत्नागिरी), मानसी भिडे (सातारा), स्वानंदी केळकर (पुणे), प्रतीक म्हैसकर (वर्धा), ओंकार बैराग (पुणे) आणि शिवहरी रानडे (मुंबई) या निवडक कलाकारांचे सादरीकरण प्रत्यक्ष परीक्षकांच्या समोर होणार आहे. जुन्या आठवणीतल्या गझलांबरोबरच काही नव्या रचनाही या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहेत.

गझल हा उर्दू-फारसी या भाषाभगिनींकडून मिळून मराठी साहित्यात, वाङ्मयात आणि संगीतातही स्थिरावलेला आणि आपलासा झालेला वृत्तप्रकार आहे. आजवर अनेक मान्यवर गझलकरांनी आणि गायकांनी मराठी गझल समृद्ध केली. गझलचे मुशायरे आणि मैफली ज्या प्रमाणात होतात, त्यामानाने गझल गायनाच्या स्पर्धा कमीच होतात. गझल गायनप्रकाराच्या सादरीकरणाची विशेष तयारी असावी लागते. स्वरांइतकेच शब्दाच्या भावार्थाकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. हेच लक्षात घेऊन आर्ट सर्कलने नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रात अगदी मोजक्याच होणाऱ्या गझल स्पर्धांमध्ये आर्ट सर्कलच्या या स्पर्धेचा समावेश झाला आहे.

ऑनलाइन फेरी आणि होणारी प्रत्यक्ष फेरी अशा दोन्हीसाठी सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे परीक्षण करणार आहेत. स्पर्धेनंतर लगेचच दत्तप्रसाद रानडे यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण होणार आहे. श्री. रानडे लोकप्रिय हिंदी, मराठी गझलांची मैफिल सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत रंगविणार आहेत. त्यांना हेरंब जोगळेकर (तबला) आणि उदय गोखले (व्हायोलीन) संगीत साथ करणार आहेत.

ही स्पर्धा ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजल्यापासून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. प्रेक्षकांनी, ही स्पर्धा बघायला, नव्या स्पर्धकांच्या नव्या – जुन्या रचना ऐकायला जरूर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply