स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

वालावल : डॉ. अशोक प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या स्वरसिंधुरत्न शास्त्रीय गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे विशेष सोहळ्यात वितरण करण्यात आले. वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर (२९ जून २०२३) हे पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

श्रुती सावंत

कोकणातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी डॉ. अशोक प्रभू यांनी २०१९ साली ही स्पर्धा सुरू केली. पहिल्या वर्षी अभंग आणि भक्तिगीत गायन स्पर्धा झाली. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे; मात्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. शास्त्रीय संगीत हा जागतिक संगीताचा पाया आहे आणि तो भक्कम झाला तर कोकणातील कलाकार जागतिक पातळीवर आपल्या प्रदेशाचे नाव उंचावू शकतील, या भावनेने कोविडच्या कालखंडानंतर आणि डॉ. प्रभू यांच्या निधनानंतर स्पर्धेत बदल करण्यात आला. आता केवळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत स्वरूपात स्पर्धा पार पडते. श्री देव लक्ष्मीनारायण भक्त परिवारातर्फे या स्पर्धेचे आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे आणि समारंभाचे संयोजन प्राचार्य प्रशांत धोंड यांनी केले.

हर्ष नकाशे

नुकतेच आयएएस परीक्षेत यश संपादन केलेले वसंत दाभोलकर आणि चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी शालेय गटातील अनुक्रमे तीन विजेते श्रुती सावंत, स्वरांगी गोगटे आणि तेजल रवींद्र गावडे, युवा गटातील हर्ष नकाशे, पल्लवी संजय पिळणकर आणि हर्षल सगुण मेस्त्री आणि खुल्या गटातील विजेत्या सौ. ईश्वरी तेजम यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र, रोख रक्कम, मानचिन्ह आणि कडुनिंबाचे झाड असे पुरस्काराचे स्वरूप होते. अ‍ॅड. पी. डी. देसाई, प्रफुल्ल वालावलकर, सुरेश वालावलकर, श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर देवस्थानचे गुरू देसाई, ललितकुमार प्रभू, प्रशांत धोंड, समीर नेवगी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सौ. ईश्वरी तेजम

दाभोली (ता. वेंगुर्ले) येथील वसंत प्रसाद दाभोळकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. श्री. दाभोळकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वेंगुर्ल्यात, बारावीपर्यंतचे कुडाळ येथे तर रत्नागिरीतील फिनोलेक्स कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. २३ मे २०२३ रोजी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. श्री. दाभोळकर यांचे वडील एसटीतून लिपिकपदावरून निवृत्त झाले आहेत.

वसंत दाभोलकर यांचा गौरव

दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. सुमित पाटील कला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते बालश्री पुरस्कार मिळाला आहे. आजवर त्यांनी ८००हून अधिक नाटकांचे नेपथ्य आणि वीसहून अधिक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. अंध, अपंग मुलांच्या सबलीकरणासाठी कलेच्या माध्यमातून ते अनेक प्रयोग सातत्याने करीत असतात, अंध मुलांना रंग ओळखता यावेत आणि चित्रे काढता यावीत, आपल्या भावना रंगीत चित्राच्या माध्यमातून त्यांना व्यक्त करता याव्यात, यासाठी प्रत्येक रंगाला गंध देऊन रंगगंध ही संकल्पना डॉ. पाटील यांनी विकसित केली. त्यासाठी त्यांना दुबई आणि सिंगापूर शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. सुमित पाटील यांचा गौरव

स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड यांनी स्पर्धेची संकल्पना स्पष्ट केली. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.) स्पर्धेचा विस्तार होण्यासाठी आता रत्नागिरी आणि गोव्यातही प्राथमिक फेरीतील स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापुढील काळात शालेय गटाची स्पर्धा होणार नाही. त्याऐवजी युवा गट आणि खुला गट अशा दोनच गटांची स्पर्धा होणार असून, अंतिम एकाच यशस्वी गायकाला स्वरसिंधुरत्न पुरस्कार देणार असल्याचे श्री. धोंड यांनी सांगितले. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम करणाऱ्या अभिनेत्री दिव्यलक्ष्मी, लवकरच सन मराठी दूरदर्शन वाहिनीवर सुरू होणार असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ मालिकेतील कलाकार, तसेच ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेसह चित्रपट, नाटक, लघुपट, एकांकिकांमधून अभिनय करणारे नित्यानंद जड्ये, निवेदक-अभिनेता नीलेश गुरव, कलादिग्दर्शक संदेश वालावलकर, वालावलचे माजी सरपंच संदीप मठकर, मालवणी ब्लॉगर अर्चना परब, मालवणी खाद्यपदार्थांच्या उद्योजिका वर्षा तळेकर यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आरतीचे प्रकाशन

श्री देव लक्ष्मीनारायणाच्या दृक्श्राव्य आरतीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. या आरतीची शब्दरचना कृष्णा कशाळीकर यांची असून, सिद्धेश साळस्कर आणि मानसी उदय पाटकर यांनी आरतीच्या चित्रीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मानसी पाटकर यांनी संगीत दिले, तर संगीत संयोजन यश नरेश शिरोडकर यांचे आहे. मिलिंद आडेलकर, यश शिरोडकर आणि मानसी पाटकर यांनी आरतीसाठी छायाचित्रण केले असून समीर नाडकर्णी यांनी संकलन केले आहे.

स्पर्धेतील यशस्वी कलाकारांची मैफल

स्वरसिंधुरत्न स्पर्धेतील यशस्वी गायकांनी साकार केलेला बहारदार गीतांचा कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आला. स्वरसिंधुरत्न पुरस्कारविजेत्या सौ. ईश्वरी तेजम यांनी सादर केलेल्या नंद रागाने मैफलीची सुरुवात झाली. पल्लवी पिळणकर, हर्ष नकाशे, तेजल गावडे, श्रुती सावंत आणि हर्षल मेस्त्री यांनी विविध भक्तिगीते सादर केली. ‘अवघा रंग एक झाला’ या सौ. ईश्वरी तेजम यांनी सादर केलेल्या भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना अभिजित बारटक्के (तबला), अतुल उमळकर (पखवाज), उमेश परब (संवादिनी), ऋचा पिळणकर (खंजिरी) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले.

हर्षल मेस्त्री
पल्लवी पिळणकर

(स्पर्धकांनी स्पर्धेत केलेल्या सादरीकरणाचे व्हिडिओ पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply