पाण्याखाली गेलेल्या चांदेराईतल्या ७७ दुकानांना प्रत्येकी ५० हजारांची मदत पालकमंत्र्यांकडून जाहीर

रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती आणि काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. काजळी नदीचे पाणी वाढल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ दोन दिवस पाण्याखाली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी (२९ जुलै) चांदेराईला भेट दिली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तिथल्या ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या वेळी उदय सामंत यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हेत्रे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. ते म्हणाले, ‘७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. दोन दिवस दुकानांत पाणी होते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत, तसेच टपरीधारकांना दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यांची पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नदीमधील गाळ काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून हा सगळा गाळ काढण्यात येईल. पाणी शिरून नुकसान झालेल्या घरांच्या बाबतीतही पंचनामे करून मदत देण्याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply