मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर पाच हजाराची कमाल मर्यादा राहणार आहे.
विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावतिरणच्या लघुदाब कृषी वर्गवारी सोडून सर्व ग्राहकांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल रोखीने भरता येणार आहे. लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.
महावितरणने वीजग्राहकांना http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही आणि कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो. या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकिंग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंटमार्फतदेखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त महावितरणने पाच हजारापेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध आहे.
क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरणा निःशुल्क आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के दराने जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंती सवलतही देण्यात आली आहे. सध्या महावितरणचे ६५ टक्के म्हणजे ११० लाख ग्राहक ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणची साधारणत: २२५० कोटी महसुलाची वसुली होते.
ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पोच मिळते. तसेच संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते. रांगेत वेळ वाया न घालवता महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या निःशुल्क ऑनलाइन भरणा सेवांचा वीज ग्राहकांनी फायदा घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

