फटाक्यांविना दिवाळी

दर वर्षीप्रमाणे वसुबारसेपासून दीपोत्सव सुरू झाला आहे. मोठ्या थाटात मुख्य दिवस साजरे झाले. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दिव्यांचा हा उत्सव सुरू राहणार आहे. दिवाळी म्हणजे खरे तर दिव्यांचा उत्सव असतो, पण अलीकडे तो आवाजाचा आणि त्यातही मोठ्या आवाजाचा उत्सव झाला आहे. त्यामुळे दिवाळी नेमकी कशी आणि कशासाठी साजरी करायची, हाच मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके लावले जातात त्यामुळे वायुप्रदूषण होते. घातक रासायनिक घटक हवेत सोडले जातात. ते दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे फटाके वाजवून संपले तरी त्यापुढचा कितीतरी काळ त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. दिल्लीपाठोपाठ मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या वातावरणाने प्रदूषणाची ठरावीक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे यावर्षी फटाके वाजविण्यावर निर्बंध आणणाऱ्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दिवाळीत सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत फटाके वाजवू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या. पण त्या हास्यास्पद होत्या. विविध प्रकारचे फटाके रात्रंदिवस फुटत होते. प्रदूषण होत होते. या काळातील प्रदूषणाची पातळी किती वाढली होती, याची आकडेवारी कालांतराने जाहीर होईल. यापुढे असे होऊ नये, यासाठी तातडीच्या म्हणून उपाययोजना केल्या जातील. त्या फटाक्याप्रमाणेच काही काळातच विझून जातील.

पर्यावरणाच्या हानीबाबत अलीकडे सजगता आल्याचे सांगितले जाते. ठिकठिकाणी त्यासाठी उपक्रम राबविले जातात. पण त्यातून अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत. फटाक्यांचा अनिर्बंध वापर हे त्याचेच उदाहरण आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर सातत्याने होत असतात. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील. या प्रत्येक निवडणुकीतील विजयाचा आनंद फटाक्यांशिवाय साजरा होतच नाही. जसे काही उमेदवार निवडून आल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्याने दिल्याशिवाय त्याचे पद अस्तित्वात येत नाही, त्याच पद्धतीने फटाके लावले नाहीत, तर जणू काही तो विजय घोषितच होत नाही, अशीच मानसिकता आहे. हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवू नयेत, अशी हास्यास्पद सूचना देणारे लोकप्रतिनिधी याचा विचार कधी करणार आहेत? फटाके वाजवायला बंदी करण्यापेक्षा मुळातच फटाक्यांची निर्मितीच थांबविली गेली पाहिजे. फटाके तयारच झाले नाहीत, तर ते वाजविले जाणारच नाहीत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा नव्हे, हे लोकमानसावर ठसले पाहिजे. प्रकाशाच्या, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा! प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी वैचारिक खाद्य देणारे दिवाळी विशेषांक हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. त्याला जागून साप्ताहिक कोकण मीडियाने यावर्षी आठवा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. त्याकरिता आठवणीतलं कोकण असा विषय निवडून स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा जाहीर केल्याने पहिले सहा लेख निवडले गेले. मात्र सर्वच लेख उत्तम होते. ते सारे एका अंकात समाविष्ट होऊ शकले नाहीत. त्यातील काही लेख या दुसऱ्या दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशा भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व लेखकांना, वाचकांना, जाहिरातदारांना शुभेच्छा!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १७ नोव्हेंबर २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

बुकगंगा, गुगल प्ले बुक्स, तसेच मॅग्झटरवर दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.

भाग दुसरा
गुगल प्ले बुक्स :
https://play.google.com/store/books/details?id=jmzjEAAAQBAJ

मॅग्झटर : https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1506995

भाग पहिला

बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8TAUO

गुगल प्ले बुक्स : https://play.google.com/store/books/details?id=eX7gEAAAQBAJ

मॅग्झटर : https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1492183

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply