पर्यटकांसाठी स्व-संरक्षणाचे सूत्र

समुद्रात बुडून पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या. नऊ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या समुद्रावर पर्यटनाला आलेल्या पुण्याच्या संकल्प सैनिक अकादमीमधील पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. १० डिसेंबरला रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील कर्दे किनाऱ्यावर पुण्यातीलच एक तरुण पर्यटक प्राणाला मुकला. धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्याचे चार क्षण म्हणून पर्यटनाला आलेले असताना असे काही तरी होत्याचे नव्हते घडणे म्हणजे अशा व्यक्तींच्या पश्चात असलेल्या कुटुंबीयांसाठी खूपच मोठा धक्का असतो. झालेल्या घटना निश्चितच दुर्दैवी आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान कशानेच भरून येण्यासारखे नाही; मात्र अशा घटना घडणे नवे नाही. तरीही यातून काही धडा घेतला जात नाही, हे मात्र अनाकलनीय आहे. पर्यटनासाठी पाणी हा अनेकांचा वीक पॉइंट असतो आणि ते स्वाभाविकही आहे. धबधबे, नद्या, तळी-तलाव आणि समुद्र या ठिकाणी म्हणूनच गर्दी होत असते; मात्र त्या ठिकाणी गेल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अनेकांना कठीण जाते आणि त्यातूनच अशा दुर्घटना घडतात.

नजरेत न मावणाऱ्या अथांग सागराच्या किनाऱ्यावरचा अनुभव स्वतःला विसरायला लावणाराच असतो. त्यातही किनारपट्टीच्या प्रदेशात वास्तव्य नसलेल्यांना तर या अनुभवाचे विशेष अप्रूप असते; मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा अनुभव जीवनाची अखेर करू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात असणे, धोक्याच्या सूचनांचे फलक लावणे, दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा आणि अँब्युलन्ससह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आदी बाबी अपरिहार्यच आहेत; मात्र पर्यटकांनी स्वतः सावध असणे हे त्याहून किती तरी महत्त्वाचे आहे. म्हणजेच अशा दुर्घटना टाळणे ही केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही. कारण गणपतीपुळ्यासह अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळी धोक्याच्या सूचनांचे फलक असूनही पर्यटक जिवावर उदार होऊन खोल समुद्रात जाण्याचे धाडस करताना दिसतात. देवगडला घडलेल्या दुर्घटनेच्या आधीही जीवरक्षकांनी काही जणांना खोल समुद्रात न जाण्याची सूचना केली होती, असे समजते; मात्र तरीही घडू नये ते घडलेच.

‘पायाखालची वाळू सरकणे’ हा मराठी भाषेतील शब्दप्रयोग केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर आलेल्या लाटा फुटून पाणी पुन्हा समुद्रात मागे जात असते तेव्हा त्या पाण्यात उभे असताना ‘पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय’ ते समजते. ‘समुद्राला कधी पाठ दाखवू नये,’ असे पूर्वापार सांगितले जाते. त्याला धार्मिक कारणांची जोड दिली जाते; मात्र त्यामागचे खरे वैज्ञानिक कारण हे आहे, याची अनेकांना कल्पना नसते. समुद्राच्या लाटेचे पाणी पुन्हा मागे जात असताना आपण किनाऱ्यावर त्या पाण्यात पाठमोरे उभे असू, तर पायाच्या खोटेखालची वाळू मागे जाऊन तिथे खड्डा तयार होतो. आपण सावध नसल्यास तोल जाऊन उलटे पाठीमागे पडण्याची शक्यता असते. पडायला झालेच तर खारे पाणी नाका-तोंडात गेल्यावर भीती वाटणे साहजिक आहे आणि सतत येणाऱ्या लाटांमुळे लगेच सावरणे अवघड असते. नदी किंवा अन्य कोणताही जलाशय आणि समुद्र यांच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. भरती-ओहोटीच्या चक्राचे गणितही लक्षात घ्यायला हवे. त्याबाबत फलकावर काही माहिती दिलेली असेल किंवा स्थानिक नागरिकांनी काही सल्ला दिला असेल, तर तो न अव्हेरता त्यानुसार वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे, याचे भान पर्यटकांनी सुटू देऊ नये. किनारा स्वच्छ ठेवणे वगैरे बाबी खूप दूरच्या झाल्या; पण निदान स्व-संरक्षणासाठीच्या या सूत्राचे पालन तरी पर्यटकांनी करावे, अशी अपेक्षा ठेवणे वावगे नसावे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १५ डिसेंबर २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply