रत्नागिरीत १०-११ फेब्रुवारीला शासकीय ग्रंथोत्सव

रत्नागिरी : येत्या १० आणि ११ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत शासकीय ‘ग्रंथोत्सव-२०२३’ होणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्‍य शासनातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यामार्फत दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा ग्रंथोत्सव १० आणि ११ फेब्रुवारी रोजी शासकीय मध्यवर्ती विभागीय ग्रंथालयात होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठक झाली. बैठकीला कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सचिव माधव अंकलगे, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मदन हजेरी, प्रशासन अधिकारी अरुणा केतकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट, प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे, ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथ दिंडी, उद्घाटन, दुपारी चर्चासत्र, दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन, दुपारी ग्रंथ आणि परिवर्तन यावर मार्गदर्शन आणि सायंकाळी काव्यवाचन आणि ग्रंथोत्सवाचा समारोप असे नियोजन असणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे, वक्ते, जिल्ह्यातील साहित्यिक, नवकवी, विचारवंत यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply