रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या १९ आणि २० फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेसह उद्योजकांसाठी विविध संधी देणारे हे प्रदर्शन आहे. जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
देशाचे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हेब यांच्या पुढाकाराने हा दोन दिवसांचा औद्योगिक महोत्सव रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ होणार आहे. नवउद्योजकांसह पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे निदेशक राहुलकुमार मिश्रा म्हणाले, कार्यक्रमाला एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नवउद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करून रत्नागिरी जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जनजागृती करून देणे आणि योजनेचा लाभ देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनादरम्यान सुमारे ६० स्टॉल्सचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. त्मध्ये रत्नागिरीतील उद्योजक आपली उत्पादने प्रदर्शित करतील. कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीदेखील केली जाईल. त्याचप्रमाणे स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. एएमएमईच्या संचालकांनी सर्व विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी एमएसमईद्वारे विक्रेता विकास कार्यक्रमदेखील आयोजित केला जाईल. त्यामध्ये एचपीसीएल, व्हीपीसीएफ, आयओसीएल, कोकण रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सहभागी होतील. तांत्रिक सत्रादरम्यान, प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संस्थेची विक्रेता नोंदणी प्रक्रिया समजावून सांगतील आणि तांत्रिक सत्रादरम्यान त्यांच्या आवश्यकतादेखील स्पष्ट करतील. कार्यक्रमादरम्यान उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणी देखील केली जाईल.
विविध संस्था आणि बँकांचे अधिकारी त्यांच्या संबंधित योजनांबद्दल सादरीकरण करतील. एमएसएमई-डीएफओचे अधिकारीही मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देतील. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नवउद्योजक आणि तरुणांना निश्चितच मदत होईल, त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसएमई-डीएफओ, नागपूरचे संचालक पी. एम.पार्लेवार यांनी केले आहे, असेही राजेश सावंत यांच्यासह श्री मिश्रा यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

