पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्याच्या प्रत्येक किरणाचा वापर करणाऱ्यांना रोटरीचा सक्रिय पाठिंबा

रत्नागिरी : जेथे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचा सुयोग्य वापर केला जाईल, अशा सर्व प्रयत्नांकरिता रोटरी परिवार पाठिंबा आणि मदत करण्यास तयार आहे, अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी दिली.

येथील रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने शिर्के हायस्कूलच्या रंजन सभागृहात आयोजित केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जाविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिक या चर्चासत्राला पूर्णवेळ उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी विद्याधर शेडगे आणि सौ. दीपिका ओमकार भाटकर यांनी हृषीकेश कोंडेकर यांची ओळख करून दिली. अध्यक्ष हिराकांत साळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन या प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लबचे खजिनदार डॉ. वैभव कानडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम व्यवस्थापक राजेंद्र (दादा) कदम यांनी चांगल्या भविष्यासाठी पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे महत्त्व पटवून दिले.

पहिल्या व्याख्यानात विद्याधर शेडगे यांनी सांगितले की, कोकणात एवढा पाऊस पडत असतानासुद्धा उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी कसे अडवता येईल, प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि खासगी विहिरी, कूपनलिकांमध्ये पावसाचे पाणी वैशिष्ट्यपूर्ण योजना करून सोडल्यास वर्षभर सर्वाना पुरेल.

शहरात खूप ठिकाणी लोक विहिरीसुद्धा वापरतातय विहिरी पहिल्या पावसातच तुडुंब भरून वाहतातय अशा वेळी विहिरीचे पुनर्भरण कसे करावे याविषयी श्रोत्यांनी प्रश्न विचारले. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण माती आणि कातळयुक्त जमिनीत पावसाचे पाणी पुनर्भरण करायचे असल्यास या विषयावर अधिक संशोधनाची आवश्यकता डॉ केतन चौधरी यांनी विशद केली.

दुसरे व्याख्यान हृषीकेश कोंडेकर यांनी दिले. सौरऊर्जेत भारत करीत असलेली जलद प्रगती आणि विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. भारतात २०३० पर्यंत ५०० गिगा वॉट एवढे प्रचंड सौरऊर्जेचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून २०२४ मध्ये सुमारे ८७ गिगावॉट सौर विजेचे उत्पादन करण्यात येत आहे. घरावरील छतावर सौर पॅनल बसवून कोकणात सुमारे ८ ते १० महिने सौर ऊर्जा सौरविजेत रूपांतरित करता येईल त्यामुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणावर बचत होते, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. त्यानंतर श्री कोंडेकर यांनी कृषी सौर पंप, रस्त्यावरील दिवे, परसबागेतील सौरदिवे याविषयी माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या शाळाच्या छतावर सौर पॅनल बसवून सौर वीज तयार केल्यास शाळेचे वीजबिल मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करता येईल, यावर चर्चा झाली.

अध्यक्षीय मार्गदर्शनात इंजिनियर हिराकांत साळवी यांनी सांगितले की, कोकणात शाश्वत विकास रुजवायचा असेल तर जलसंवर्धन आणि सौरऊर्जा निर्मिती हे महत्त्वाचे घटक असतील आणि सर्व नागरिकांनी स्वयंप्रेरणेने या दोन्ही बाबींचा स्वीकार केल्यास पर्यावरणपूरक जीवनशैलीत मोठी सुधारणा होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी अखंड ऊर्जास्रोत आणि उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. हे चर्चासत्र म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नसून नवीन तंत्रज्ञान स्वीकृतीसाठी एका चळवळीची सुरुवात आहे. जेथे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचा सुयोग्य वापर केला जाईल, अशा सर्व प्रयत्नांकरिता रोटरी परिवार पाठिंबा आणि मदत करण्यास तयार आहे.

चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी केदार माणगावकर, दिगंबर मगदूम, सीताराम सावंत, सुवर्णा चौधरी, डॉ. स्वप्ना करे, आणि दीपिका भाटकर यांचे सहकार्य लाभले. सहाय्यक प्रांतपाल ऍड. शाल्मली अंबुलकर, माजी अध्यक्ष बिपीनचंद्र गांधी, वामन सावंत, अॅ ड. विनय अंबुलकर, संतोष सावंतदेसाई, रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, नीलेश मुळ्ये, इंटरॅक्ट क्लब ऑफ नवनिर्माण हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply