आरएचपी फाउंडेशनकडून दिव्यांग समीर सावंतला यांत्रिक व्हीलचेअर

रत्नागिरी : समीर चंद्रकांत सावंत (दोनवडे-कातळवाडी, ता. राजापूर) या दिव्यांग व्यक्तीला आरएचपी फाउंडेशनकरून यांत्रिक व्हीलचेअरची मदत देण्यात आली.

समीरचे वय ३० वर्षांचे असून त्याचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले आहे. वडील चंद्रकांत सावंत शेती करतात, तर आई चंद्रभागा चंद्रकांत सावंत गृहिणी आहे. समीरला तीन विवाहित बहिणी आहेत. समीर १० वर्षांचा असताना शेतातील बांधावरून पडल्याने पायाला फ्रॅक्चर झाले. कणकवलीतील एका रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली. थोडे चालायला येऊ लागले. पण दोन वर्षांनी तो पावसात पाय घसरून पडला. त्यानंतर त्याला चालायला येणे पूर्णपणे बंद झाले. तो तीन वर्षे घरातच बसून होता. त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही.

नंतर २०१० साली कोल्हापूरच्या हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप संस्थेची माहिती मिळाल्याने त्याने तेथे शिक्षणासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचे वय अधिक असल्याने त्याला तेथे प्रवेश मिळाला नाही. नंतर २०११ साली हेल्पर्सच्या सिंधुदुर्गमध्ये असलेल्या स्वप्ननगरी काजू प्रोसेसिंग युनिटमध्ये तो रोजगारासाठी गेला. तेथे पहिल्यांदा त्याला व्हीलचेअर वापरायला मिळाली आणि त्याच्या आयुष्याला गती आली. तेथे काम करत असतानाच पुण्यात येथे महात्मा फुले योजनेअंतर्गत मोबाइल रिपेअरिंगचा कोर्स केला. गावी दुकान सुरू करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. पण जवळ स्वच्छतागृहाची सोय नसल्याने दोन वर्षे तो घरातच बसून होता. नंतर २०१७ साली पुन्हा कणकवलीला काजू युनिटमधे रोजगारासाठी गेला. तेथे काजूचे सीलिंग, ग्रेडिंगचे चांगले काम तो करत आहे.

समीरला आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक करीम नाकाडे यांची माहिती मिळाली. त्याच्या पालकांनी समीरचे नाव या संस्थेत नोंदविले. समीरची परिस्थिती जाणून घेऊन आरएचपी फाउंडेशन आणि फ्रेण्ड्स फाउंडेशन (ऐरोली) यांच्या सहकार्याने इम्पॅक्ट गुरू फाउंडेशनशी ओळख झाली. त्यांच्या मदतीने निओमोशन ही अलेक्ट्रिकल व्हीलचेअर मिळाली. ती समीरला देण्यात आली. आता तो बाहेर जाऊन स्वत:ची काम करणे कोणाच्याही मदतीशिवाय करू शकतो. त्याच्यामधील आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यामुळे आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त झाला आहे. त्यामुळे समीर आणि त्याचे पालकही खूश आहेत. त्यांनी आरएचपी फाउंडेशन, फ्रेण्ड्स फाउंडेशन, इम्पॅक्ट गुरू फाउंडेशन, बजाज आणि निओमोशनचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply