ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सोळावा भाग…
………….
या लेखमालेतील एका लेखामध्ये आपण सप्तचिरंजीवांचा आणि महाभारताचा काय संबंध आहे याचा विचार थोडक्यात केला होता. या सप्तचिरंजीवांचे अस्तित्व नित्य आहे. म्हणजे त्यांच्या प्रवृत्ती या कायमच्याच आहेत. जसे महर्षी व्यासांसारखे परमज्ञानी जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान
बुडते हे जन देखवे ना डोळा
येतसे कळवळा म्हणोनिया
किंवा
जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांची सांगावे ।
शहाणे करोनी सोडावे ।सकळजन।।
या न्यायाने लोकांपर्यंत पोहोचवणारे महात्मे प्रत्येक युगामध्ये होतात. म्हणजेच हेच व्यासांचे चिरंजीवित्व होय. ‘माझा सख्खा भाऊ असला, तरी सत्यनिष्ठेसाठी प्रसंगी मी त्याचा विरोध पत्करीन,’ अशी निर्भीड वृत्ती म्हणजेच बिभीषणाचे चिरंजीवित्व होय. आपल्या स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांपुढे लाचारी पत्करणारे आजच्या काळातील विद्वान लोक म्हणजे कृपाचार्यांचे सद्यस्थितीतील अवतार होत. आपल्या प्रत्येक सद्गुणाचा ईशसेवेसाठी आणि ईश्वरभक्तांच्या भल्यासाठी विनियोग करणारे, पण त्याचा कोणताही गर्व न बाळगणारे खरे दास म्हणजेच महारुद्र हनुमंतांचे चिरंजीवित्व होय. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी तितक्याच ताकदीने सांभाळणारे आणि या दोन्ही गोष्टींचा दुष्टांचे निर्दालन आणि चांगल्याचे नवनिर्माण यासाठी वापर करणारे मानव हे मात्र भगवान परशुरामांचे वारसदार होत. भगवान परशुराम हे श्रेष्ठ गुरू होते. त्यांनी ज्यांना शिकवले ते भीष्म, द्रोण, कर्ण हे महाभारत युद्धामध्ये सरळ लढाईत मारले गेले नाहीत. त्यांना कूटनीतीने मारावे लागले. आपल्याकडील ज्ञान सत्पात्री शिष्याला देऊन त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ बनवणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री परशुरामांची चिरंजीव गुरूवृत्तीच दिसते ना? सर्व ऐश्वर्य एका क्षणामध्ये श्रीभगवंतांच्या चरणी समर्पण करणारे आणि सगळ्याबरोबरच ‘स्व’चेही ‘इदं न मम’ या भावनेने समर्पण करणारे सर्व थोर दाते हे बळीराजाचे खरे वारसदारच म्हणावे लागतील.
याचप्रमाणे आत्यंतिक सूडाने पेटलेला माणूस काय करू शकतो, याचे दर्शन अश्वत्थाम्याच्या कथेतून घडते. आपल्या पित्याला एक प्रकारे फसवून मारले गेले याचा राग मनात ठेवून अश्वत्थामा वावरत होता. महाभारताचे युद्ध अठराव्या दिवशी संपले; पण अश्वत्थाम्याच्या मनातील सूडाग्नी शांत झाला नव्हता. त्याने रात्री पांडवांच्या शिबिरात घुसून निश्चिंतपणे झोपलेल्या पांडवपुत्रांची आणि अनेक वीरांची निर्घृण हत्या केली. वास्तविक, युद्धापूर्वी ठरलेल्या नियमांमध्ये हे बसणारे नव्हते; पण अश्वत्थाम्याने सारासार विवेकबुद्धी गमावली होती. याच प्रकारे जेव्हा अश्वत्थामा आणि अर्जुन यांचे युद्ध झाले. तेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायचे ठरवले. प्रत्युत्तरादाखल अर्जुनानेही ब्रह्मास्त्र उगारले. दोघांनी ब्रह्मास्त्र सोडले, तर काय अनर्थ होईल हे जाणून अनेक ऋषी-मुनींनी उभय वीरांना ब्रह्मास्त्र परत घेण्याची विनंती केली. अर्जुनाने त्याप्रमाणे अस्त्र मागे घेतले. अश्वत्थाम्याला ते मागे घेता येत नव्हते. म्हणून त्याने ते अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी असलेल्या गर्भावर सोडले. म्हणजेच पांडव आणि कौरवांचा वंश पूर्णतः संपवणे यासाठीच त्याने अस्त्रप्रयोग केला. हीच वृत्ती म्हणजे अश्वत्थाम्याची चिरंजीव सूडवृत्ती होय. याचा परिणाम म्हणजे तो स्वतःच अजूनही अस्वस्थ अवस्थेत भटकत आहे, असे सांगितले जाते. थोडक्यात, सूडभावनेने कोणीच सुखी होऊ शकत नाही, हा धडा अश्वत्थामा शिकवतो. महाभारत म्हणजे केवळ लहान मुलांना सांगण्याच्या मनोरंजनात्मक कथा नव्हेत, तर त्यांचे नित्य चिंतन करून त्यातून स्व-विकास घडवून देणारे ते एक मोठे साधनच आहे. पुढील लेखांमध्ये आपण महाभारतातून काय शिकावे याचे चिंतन करू या.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

