पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बेजबाबदारपणामुळे माणगावचे ग्रामस्थ वेठीला

माणगाव : कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बेजबाबदारपणाचा अनुभव आज माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थ सुमारे दोन तास अनावश्यक वेठीस धरले गेले. यक्षिणी हे माणगावचे ग्रामदैवत आहे. हे देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाखाली चालविले जाते. स्थानिक आणि दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी मंदिराची स्थानिक उपसमिती स्थापन करण्यात येते. या उपसमितीची मुदत संपल्यामुळे गेले काही महिने मंदिराचे काही व्यवहार ठप्प झाले आहेत. उपसमिती अस्तित्वात नसल्यामुळे देणगीच्या पावत्यांपासून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. या उपसमितीची निवड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने माणगावच्या ग्रामपंचायतीला पत्र लिहून ग्रामस्थांची सभा आज म्हणजे ७ मार्च २०२५ रोजी आयोजित करायला कळविले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने काल गावात दवंडी पिटविली. त्यानुसार जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे आज ग्रामस्थ दोन वाजल्यापासूनच मंदिरात बैठकीसाठी दाखल झाले; मात्र तीन वाजले तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संबंधित अधिकारी बैठकीला आले नाहीत. काही ग्रामस्थांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी संपर्क साधला असता त्या बैठकीसाठी नियुक्ती केलेले संबंधित अधिकारी अभ्यास दौऱ्यावर गेले असल्यामुळे आज बैठक होऊ शकणार नाही, असे फोनवर सांगण्यात आले. पुढची बैठक २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करावी, असेही सांगण्यात आले. तसे सभेमध्ये जाहीर करण्यात आले. नेहमीची कामे टाकून जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात जमले होते, पण आयत्यावेळी सभा पुढे ढकलली गेल्याचे जाहीर केल्यामुळे ग्रामस्थ अत्यंत संतप्त झाले.

सभेची वेळ दुपारी अडीच वाजता ठरली असल्यामुळे तत्पूर्वी संबंधित अधिकारी बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. प्रत्यक्षात दोन वाजून ५५ मिनिटांनी संबंधित कार्यालयाने अधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे कळविले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळ उडाला. अभ्यास दौऱ्याचे नियोजन आधीच झालेले असण्याची शक्यता आहे. असे असताना बैठक का ठरविली गेली आणि लोकांना आपली कामे टाकून बैठकीला उपस्थित राहण्यासाठी का प्रवृत्त केले गेले, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. बैठकीला सरपंच सौ. भोसलेही अनुपस्थित होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या श्री. सावंत नावाच्या कर्मचाऱ्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आलेला निरोप वाचून दाखविला. बैठक होणार नसेल तर किमान आदल्या दिवशी गावात दवंडी पिटण्यापूर्वी ते कळविणे आवश्यक होते. ते झाले नाहीच. पण बैठकीची वेळ होऊन गेल्यानंतर अर्ध्या तासाने समितीकडून बैठक रद्द झाल्याचे कळविण्यात आले. पूर्वनियोजित असूनही आणि गावाशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असूनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे, असा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला मात्र अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या संतापाला कोणीही उत्तर देऊ शकले नाही. आज रद्द झालेली बैठक आता येत्या २३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply