मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे नाट्य शुक्रवार उपक्रम

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. राज्यभरातील प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमात प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

पत्रकार संघाच्या नगर चौक येथील सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्जेदार प्रायोगिक एकांकिका, एकपार्त्री प्रयोग, दीर्घांकांचे मोफत प्रयोग होतील. नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. येत्या २५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑइलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळ देणे आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणे, हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजातील उपक्रमशील घटकांसाठीही एक प्रेरणास्थान असावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उपक्रमाला इंडियन ऑइलचे प्रायोजकत्व लाभल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

या उपक्रमात सादरीकरण करणार्‍या नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे १० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच संघाचे सभागृह पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

नाट्य शुक्रवार उपक्रमाचे संचालन करण्यासाठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची समिती स्थापन करण्यात आली असून, या उपक्रमासाठी प्रायोगिक रंगभूमीची नाटके स्वीकारण्याचा अंतिम निर्णय ही समिती घेईल. यासाठी कोणतीही नोंदणी फी आकारली जाणार नाही. ‘नाट्य शुक्रवार’ हा एक प्रकारे सांस्कृतिक लोकचळवळीचा आरंभ असून, पुढील काही महिन्यांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचाही मानस देवदास मटाले यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाने सुरू केलेला हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रम स्तुत्य असून महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांसाठी पथदर्शी असल्याचे रवींद्र देवधर म्हणाले. या नाट्यउपक्रमात मुंबईसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नाट्यकलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळेल, असे नयना रहाळकर म्हणाल्या. या उपक्रमात ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत, त्यांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रवींद्र देवधर (९४२२३४४५५५) आणि नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या उपक्रमास नाट्यरसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply