चारित्र्यसंपन्न ज्ञान आवश्यक – डॉ. सदानंद आग्रे

रत्नागिरी : शिक्षण हे खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण करणारे असावे. माणसाला माणूस म्हणून जगवणारे असावे. ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव व राजकीय क्षेत्रात आढळणारा तत्त्वांचा विसर लक्षात घेता चारित्र्यसंपन्न ज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद आग्रे यांनी केले.

कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन सर्वोदय छात्रालयातर्फे कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, विद्यमान अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके उपस्थित होते.

डॉ. आग्रे यांनी बाळासाहेब खेर यांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांचे चरित्र अभ्यासताना विविध प्रसंगांतून हे जाणवते, त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचा संदर्भ देत आजच्या काळात आपण माणूस म्हणून कसे जगले पाहिजे, हे त्यांनी समजावून सांगितले. सर्वोदयाची स्थापना व आपण सर्वजण कसे जोडले गेलो आहेत, याचे सुरेख विवेचन करताना ते म्हणाले की, सर्वोदय छात्रालयाने आतापर्यंत १६०० विद्यार्थ्यांना घडवले. ते सर्वोदयाचा विचार सर्वत्र पेरत आहेत. विद्यार्थ्यांनी बाळासाहेब खेर, अप्पासाहेब पटवर्धन आणि अनेक महान नेत्यांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यातून विचार करा, कृती करा. पूर्वीच्या काळातही समता नव्हती व ती आजही नाही. समाजामध्ये विषमतेच्या पाली चिकटलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत सर्वोदय छात्रालयाचे काम आजही उठून दिसणारे आहे.

सर्वोदय छात्रालयाला यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख अशा महान नेत्यांनीही भेट दिली आहे. बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना शिक्षणाविषयी तळमळ असल्यानेच त्यांनी शिक्षण खाते स्वतःकडे ठेवले होते. शिक्षण खाते स्वतःकडे ठेवणारे ते हिंदुस्थानातील एकमेव मुख्यमंत्री असावेत. आपल्या पश्चात मूळ गावातील संपूर्ण जमीन त्यांनी समाजासाठी ट्रस्टला दान केली. आज हे दातृत्व कुठे दिसत नाही.

व्यवस्था समितीच्या सदस्य वीणा काजरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यमुनाबाई खेर ट्रस्टचे संस्थापक बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन हा संस्थेच्या वतीने कृतज्ञता दिवस म्हणून साजरा होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ यांनी दिली. आगामी काळातील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते म्हणाले की, आजचा दिवस म्हणजे फक्त भाषण ऐकायचा नाही, तर तर भाषण ऐकून विचार करायचा, चिंतन करायचा आणि कृती करायचा आहे. बाळासाहेब खेर व अप्पासाहेब पटवर्धन हे गांधीजींचे शिष्य. बाळासाहेब राजकारणात गेले व अप्पासाहेबांनी समाजकारण केले. सुरवातीच्या काळात स्वातंत्र्य मिळवणे हे उद्दिष्ट होते. त्यानंतर दलित, पीडित वंचितांच्या उद्धारासाठी या दोघांनी अतुलनीय कार्य केले. ते आजही सर्वांच्या ध्यानात आहे.

मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, शिवराज जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. मंदार गीते, डॉ. अंकुश खरवतेकर, डॉ. शरद प्रभुदेसाई, युयुत्सु आर्ते आणि आर्किटेक्ट संतोष तावडे, कार्यवाह नरेंद्र खानविलकर आदींसह विद्यार्थी, रत्नागिरीकर कार्यक्रमाला उपस्थित होते. उपाध्यक्ष जयश्री बर्वे यांनी सूत्रसंचालन केले तर गजानन चाळके यांनी आभार मानले.

यावर्षीचा बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार प्रथमेश दिलीप लांबे याला देण्यात आला. कै. मोरोपंत जोशी व कै. सौ. सरस्वती जोशी तात्या-ताई शिष्यवृत्ती मयूर विश्वनाश सुर्वे, कै. राजाराम पांगम शिष्यवृत्ती विशाल रामचंद्र लटके याला देण्यात आली. कै. हेमलता गीते शिष्यवृत्ती विभागून विराज राजाराम कोतवडेकर व दिगंबर गंगाराम रहाटे याला, कै. पद्मजा व कै. विष्णू बर्वे शिष्यवृत्ती विपुल दत्ताराम धडम, कै. सौ. शैलजा रमेश भाटकर शिष्यवृत्ती विभागून प्रीत सचिन पावसकर व सुजल संजय जोगळे याला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply