संगमेश्वर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पटकावले उपविजेतेपद

संगमेश्वर : कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय (पुणे) आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोसुंब (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात १७ वर्षे वयोगटाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत कसबा येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील (कसबा-संगमेश्वर) १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या कबड्डी संघाने अभूतपूर्व कामगिरीचे प्रदर्शन करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये संघाने उपविजेतेपद पटकावले. कसबा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या संघानेही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

गेल्या अनेक वर्षापासून कसबा हायस्कूलने विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर यश संपादन करून क्रीडा क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. शाळेच्या परंपरेला साजेसे यश मिळवून कबड्डी संघातील विद्यार्थिनींनी संपूर्ण स्पर्धेत जिद्द, चिकाटी आणि संघटित खेळाची छाप उमटवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या दोन्ही संघांना विद्यालयातील शिक्षक एन. एस. ओकटे आणि यू. टी. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलफे, खजिनदार शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य एच. जी. शेख, पर्यवेक्षक एस. ए. पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी उपविजेतेपद मिळवलेल्या कबड्डी संघातील खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply