ओळख महाभारताची – भाग १५

महाभारतातील सुभाषिते

रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यांनी विश्वाला अनेक सुंदर विचार दिले आहेत. या ग्रंथांमधील श्लोक आजही आपण सुभाषितांसारखे वापरत असतो. उदाहरणार्थ, महाभारतामध्ये ज्ञानासारखे पवित्र काही नाही, असे सांगताना “नहि ज्ञानेन सदृश्यम् पवित्रमिहविद्यते|” असे म्हटले आहे. आता हे वचन अनेक शाळांच्या बोधवाक्याच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळते.

आपल्याला प्रगती करावयाची असेल तर कष्टाला पर्याय नाही. समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात,
कष्टेविण राज्य नाही |
कष्टेविण विद्या नाही |
केल्याविना होत नाही |
साध्य जनी|
हाच विचार महाभारतकार सांगतात, ”उत्साहश्चपि यत्नेन कर्तव्यो भूतिमिच्छता|” म्हणजेच वैभवाची इच्छा करणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे. अशाच एका श्लोकामध्ये असे म्हटले आहे, दुसऱ्याची निंदा करण्यात सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच परनिंदा करण्यात दुर्जनाला अतिशय आनंद होतो. आणखी एका ठिकाणी असे म्हटले आहे की, अरेरे… मोठी दुःखाची गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे सज्जनाला दुःख होते, त्याच गोष्टीमुळे दुर्जनाला अतिशय आनंद होतो.
अहो बत महत् कष्टम विपरीतमिदम जगत् |
येनापत्रपते साधूरसधुस्तेन तुष्यति ||

आपल्या भारताचे ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते. अर्थात नेहमी सत्याचा विजय होतो. महाभारतामध्येही सत्याची महती वर्णन केली आहे.
नास्ती सत्यसमो धर्मो न सत्यादविद्यते परम् |
न हि तीव्रतरम् किंचिदनृतादीह विद्यते||
म्हणजेच सत्याशिवाय दुसरा धर्म नाही. सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही आणि असत्यापेक्षा अधिक भयंकर जगात काहीच नाही.

एका ठिकाणी महाभारतकार सत्य आणि अश्वमेध यज्ञाची तुलना करतात. ते म्हणतात, ”तराजूच्या एका पारड्यात हजार अश्वमेध यज्ञ आणि दुसऱ्या पारड्यात सत्य ठेवले तर सत्याचेच पारडे जड असेल.
अश्वमेध सहस्रच सत्यम् च तुलया ध्रुतम |
अश्वमेध सहस्राधि सत्यमेव विशिष्यते||
सध्याच्या राजकारणात आज दोन पक्ष एकत्र दिसतात, तर उद्या तेच दोन पक्ष परस्परविरोधी भूमिकेत उभे राहतात आणि त्यावेळी दोन्ही पक्षांकडून राजकारणात कोणी कोणाचा कायमचा वैरी नसतो असे सांगितले जाते. गंमत म्हणजे हा महाभारतातीलच विचार आहे. दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो,
शत्रुच्चैव हि मित्रम् च न लेख्यम् न च मातृका |
यो वै संतापयति यम स शत्रु प्रोच्यतें नृप ||
म्हणजेच हे राजा, हा अमका तो शत्रू आणि अमका तो मित्र असा कोणावर शिक्का मारलेला नाही किंवा कोरून ठेवले नाही. तर ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्यालाच आपला शत्रू असे म्हणतात. आणखी एक अप्रतिम सुभाषित पाहा. रचनाकार म्हणतात, जे लोक धन्य आहेत त्या लोकांच्या साधनांमध्ये दक्षता हा सर्वांत श्रेष्ठ गुण आहे. सर्व धनांमध्ये विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. सर्व लाभांमध्ये उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य आणि सर्व सुखांमध्ये संतोष हेच सर्वश्रेष्ठ सुख होय.
मूळ श्लोक असा आहे,
धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तम् श्रुतम् |
लाभानाम् श्रेय आरोग्यम् सुखानां तुष्टिरुत्तमा ||
किती सुंदर बोध आहे ना? भारतीय संस्कृतीमध्ये वृद्ध ही संकल्पना केवळ वयाशी संबंधित नाही. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध असे तीन प्रकारचे वृद्ध सांगितले आहेत. अशा ज्येष्ठांची सेवा केली तर माणूस ज्ञानी होतो. महाभारतामध्येही असे म्हटले आहे की, ‘बुद्धिमान् वृद्धसेवया |’ आपल्याला आपले हित व्हावे असे वाटत असेल, तर काय करावे याबद्दलही महाभारत मार्गदर्शन करते. ते म्हणते, ”आपण आपल्या शत्रूचेही गुणग्रहण करावेत आणि आपल्या गुरूंचे दोष निंद्य मानावेत.”

एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या या सुभाषितांचे नित्यपठण करू या.
(क्रमशः)
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply