ओळख महाभारताची – भाग १६

महाभारतातील भाषा आणि विचारसौंदर्य

मागच्या भागात आपण महाभारतातील सुभाषितांचा खजिना किती मोठा आहे, याची त्याची छोटी झलक पाहिली. या भागातही महाभारतातील भाषासौंदर्य आणि विचारसौंदर्याचे दर्शन घडवणारे श्लोक पाहू या.

वास्तविक रामायणापेक्षा महाभारत थोडे कोरडे आहे. रामायणाचे रचनाकार एकच आहेत, तर महाभारताचे अनेक संस्करण झाल्यामुळे रचनाकारही अनेक असावेत, असे अभ्यासक मानतात. रामायणामध्ये कौटुंबिक नाती जपण्याचा आग्रह दिसतो तर महाभारतामध्ये नात्यांपेक्षा व्यवहार आणि स्वतःचे हित याला प्राधान्य दिलेले दिसते. तरीही रामायणप्रमाणेच महाभारत हे मार्मिक आणि मोजक्या शब्दयोजनांनी वाचकांचा मनाचा ठाव घेते.

उद्योग पर्व असे सांगते की तळ्यात वाढणाऱ्या कमळाच्या फुलांप्रमाणे एकमेकांना साह्य करून आणि परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो. राज्य चालवणाऱ्याने कुठल्या प्राण्याकडून कुठला गुण घ्यावा, हे सांगताना महाभारतकार म्हणतात, गिधाडाप्रमाणे दूरदृष्टी ठेवावी. बगळ्याप्रमाणे निश्चल राहावे. कुत्र्याप्रमाणे हालचाल करावी. सिंहासारखा पराक्रम गाजवावा. कावळ्याप्रमाणे साशंक असावे. प्रसंगी सर्पासारखी नागमोडी वागणूक ठेवावी.

सर्व माणसांसाठी उद्योग पर्व सावधगिरीची सूचनाही देते. ते म्हणते, वृद्धत्व रूपाचा नाश करते, आशा धैर्याचा नाश करते. मृत्यू प्राण्यांचा, मत्सर धर्माचरणाचा, क्रोध लक्ष्मीचा, दुर्जनांची सेवा शीलाचा, विषयांची इच्छा विनयाचा आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो. महाभारतकार दुर्योधनादी कौरव कसे आहेत ते सांगताना म्हणतात, दुर्योधन हा क्रोधमय विशाल वृक्षाप्रमाणे आहे. कर्ण बुंध्याप्रमाणे, शकुनी शाखेप्रमाणे आणि दुःशासन समृद्ध फळ-पुष्पाप्रमाणे आहे अज्ञानी धृतराष्ट्र राजा हे या वृक्षाचे मूळ आहे.

मग पांडव कसे आहेत ते सांगताना, आदि पर्व सांगते. युधिष्ठिर हा धर्ममय विशाल वृक्षाप्रमाणे आहे. अर्जुन बुंध्याप्रमाणे, भीम शाखेप्रमाणे, नकुल आणि सहदेव ही माद्रीची मुले समृद्ध फळे-फुले आहेत. कृष्ण ब्रह्म आणि ब्राह्मण ही याची मुळे आहेत.

अशा सुभाषितांप्रमाणेच महाभारतातील पात्रांचा परिचयसुद्धा खूप छान प्रकारे करून दिलेला दिसतो. वन पर्व अध्याय ४५ मध्ये अर्जुनाचा परिचय करून देताना रचनाकार म्हणतात, अत्यंत शूर, तेजस्वी, क्षमाशील अंतःकरणाला मत्सराचा स्पर्श नाही, असा आणि वेद उपनिषदादी वाङ्मयाचा ज्याने अभ्यास केला आहे, असा अर्जुन. याचप्रमाणे स्त्री पर्व अध्याय १६ मध्ये गांधारीचे वर्णन करताना महाभारत म्हणते, पतिव्रता, भाग्यशाली, स्वेच्छेने अंधत्व स्वीकारणारी, उग्र तपाने युक्त आणि नेहमीच सत्य भाषण करणारी अशी गांधारी.

मूळ श्लोक असा आहे,
पतिव्रता महाभागा समान व्रतचारिणी |
उग्रेण तपसायुक्ता सततम् सत्यवादिनी||

आपण या लेखमालेतील गांधारीचे वर्णन करणारा लेख वाचलात, तर वरील श्लोकाची यथार्थता अधिक स्पष्ट होईल. महामंत्री विदुर कोणते काम करत होते, ते सांगताना उद्योगपर्व अध्याय १४८ असे सांगते,
कोष संवर्धने दाने भृत्यानाम चान्ववेक्षणे |
भरणे चैव सर्वस्य विदुरहा सत्यसंगर ||
म्हणजेच राज्याच्या कोषाकडे लक्ष ठेवणे, कोषातील धन वाढवणे अधिकारी व नोकर यांच्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांचा पगार वेळच्यावेळी होतो की नाही, ते पाहणे ही विदुराची कामे होती.

अशा महाभारताचा प्रवृत्तिधर्म प्रतिपादन करणारा ग्रंथ इतकाच मर्यादित विचार करून चालणार नाही. या ग्रंथाने निवृत्तिधर्म अर्थात पारलौकिक प्राप्ती करून घेण्याचे मार्गदर्शन करणारा धर्म म्हणूनही कार्य केले आहे.

पुढील भागात या ग्रंथाच्या समारोपाचे भारत-सावित्री सार काय आहे ते पाहू या.
(क्रमशः)
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply