हिंदू संस्कृती विश्वाच्या हिताची- सौ. नयना सहस्रबुद्धे

रत्नागिरी : हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. हिंदू संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती व कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये- सहस्रबुद्धे यांनी केले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी गुंफले. त्यांनी बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबांसमोरील आव्हाने याविषयी उद्बोधक विचार मांडले. त्यांनी बहुमोल विचार मांडले. त्या म्हणाल्या की, आपल्या जीवनशैलीमध्ये स्व- भाषा, स्व- भूषा, स्व- भोज हे विषय महत्त्वाचे आहेत. या तिन्ही गोष्टींमध्ये आपण मूल्य म्हणून पाहावे व नवीन गोष्टीचा स्वीकार करावा. हिंदू संस्कृतीने आवश्यक बदल स्वीकारले. अर्थात काही बदल कृत्रिम व संघटित पद्धतीने बाजारपेठ म्हणून पूरक माहिती पेरली जाते. असे अनेक बदल समाजमाध्यमातून पेरले जात आहेत. परंतु आपण ही माहिती सत्य आहे का, याची खात्री करूनच स्वीकारावी. आपल्याला धोका दिसतो तेव्हा कोणते बदल घडवायचे, कोणते स्वीकारायचे, हे ठरवले पाहिजे. हवे आहे ती स्वीकारायचे, नकोय ते सोडून द्यायचे याची मुभा हिंदू संस्कृतीने दिली आहे. त्यामुळे ही एक प्रकारे आध्यात्मिक लोकशाही आहे, त्यामुळे आपण त्याकडे कौतुकाने पाहिले पाहिजे, असे सौ. सहस्रबुद्धे म्हणाल्या. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

हल्ली आजच्या पिढीला घरात जेवण करायची सवय नाही. परंतु आपण बाहेरून जेवण आणले तर त्यातील पोषणमूल्य पाहिले पाहिजे. नवीन भोजन प्रकार शिका, पण पोषण मूल्यांशी तडजोड करू नका. कपड्यात बदल होणार आहेत. परंतु फॅशन इंडस्ट्री ही एक सामूहिक यंत्रणा राबवते. त्यावेळी आपण विचार केला पाहिजे. कपडे परिधान करताना शालीनता मूल्य जपले पाहिजे. हे मूल्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

१९९० नंतर शहरीकरण वाढले आणि एकत्र कुटुंबपद्धती बदलू लागली. आज घरात जेवण तयार आहे, हे घरातील सदस्यांना मोबाइलवर कळवले जाते. हे धोकादायक आहे. सध्या रीलच्या जमान्यात भान उरलेले नाही. त्यामुळे सकारात्मक गोष्टींच्या रील्स बनवा व त्या पाठवा. नोकरीत बैठ्या जीवनशैलीमुळे व ताजे अन्न न खाल्ल्याने आजार वाढले आहेत. आपण आभासी संपर्कात आहोत. कष्ट कमी झाले व पैसे भरपूर झाले आहेत, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी घेतला. त्यांनी बाळशास्त्रींचा जीवनपट उलगडून दाखवला. प्रास्ताविकामध्ये के जी एन सरस्वती फाऊंडेशन आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दर्पणच्या स्थापनादिवसानिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा होतो. त्यांचे स्मरण करण्याकरिता ही व्याख्यानमाला गेल्या वर्षापासून कऱ्हाडे ब्राह्मण संघ आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली. संघ शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असून दोन वर्षांनी शतकमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी सौ. सहस्रबुद्धे यांचा सत्कार माधव हिर्लेकर यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन केला. या वेळी अशोक घाटे, उमेश आंबर्डेकर, चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. ऋचा जोशी, दिलीप ढवळे, प्रमोद कोनकर, शिल्पा पळसुलेदेसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. तसेच सौ. सहस्रबुद्धे यांचा परिचय करून दिला. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply