रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद विजेते रामचंद्र सप्रे स्मृती एच2ई पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य निवड अमॅच्युअर बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत आज, दि. १६ जानेवारी रोजी दिमाखात प्रारंभ झाला.
संपूर्ण राज्यभरातून २३ जिल्ह्यांतील एकूण १४४ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यातील ८२ खेळाडू फिडे गुणांकनप्राप्त आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पंधरा वर्षांखालील एकूण १०० पेक्षा अधिक बाल बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे, केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आले. याप्रसंगी केजीएन सरस्वती फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सचिव सौ. ऋचा जोशी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत मोदी, सुभाष शिरधनकर व राज्य संघटनेचे खजिनदार व मुख्य पंच भारत चौगुले उपस्थित होते.
राज्य संघटनेने आपल्याकडे कोकण पट्ट्याच्या बुद्धिबळ विकासाची जबाबदारी दिली असून आजची स्पर्धा त्याचीच पहिली पायरी असून सर्व पदाधिकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर उत्तरोत्तर अधिकाधिक उपक्रम राबविण्यात आपण अग्रेसर राहू, असे श्री. खरे यांनी सांगितले.
केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. हिर्लेकर यांनी मनोगतात सप्रे स्मृती स्पर्धेच्या इतिहासाचा मागोवा घेत आज होऊ घातलेल्या पहिल्या वहिल्या क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धेची संधी दिल्याबद्दल राज्य संघटनेचे आभार मानले. तसेच १३ वर्षे अविरत चालू असलेली ही स्पर्धा पुढेही सुरु ठेवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
राज्य संघटनेचे खजिनदार व मुख्य पंच यांनी आवाहन केले की, रत्नागिरीत आपण गेले वर्षे पंच म्हणून येत असून अशा उत्तम स्पर्धा दर वर्षी होत राहाव्यात, जेणेकरून येथील खेळाडूंना जागतिक स्तरावर खेळाडूची ओळख निर्माण करणारे फिडे गुणांकन मिळू शकेल आणि उदयोन्मुख खेळाडू नावारूपाला येतील.
डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, खेळाडू, पालक, प्रशिक्षक यांनी रत्नागिरीमध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह वाढवल्याबद्दल आभार मानले.
स्पर्धेत छत्रपती संभाजीनागरचा इंद्रजित महिंद्रकर, नागपूरचा शुभम लाकुडकर आणि कौस्तुभ बरात, कोल्हापूरचा आदित्य सावळकर, सांगलीचा आदित्य चव्हाण, पुण्याचा साहिल शेजळ व ओम रामगुडे हे अग्रमानांकित खेळाडू असून स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. स्पर्धेत पंच म्हणून भरत चौगुले, प्राची मयेकर, पौर्णिमा उपळावीकर माने, मनीष मारूलकर व शशिकांत मक्तेदार काम पाहत असून सर्व तांत्रिक जबाबदारी विवेक सोहनी व चैतन्य भिडे पार पाडत आहेत.
स्पर्धा मराठा भवन मंगल कार्यालयात सुरू असून सर्व बुद्धिबळप्रेमींनी १६-१८ जानेवारी दरम्यान स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

