रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या अभिव्यक्तीला चालना देणे आणि साहित्यिक जाणीव वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याअंतर्गत काव्य लेखन, वक्तृत्व आणि कथाकथन अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्यलेखन स्पर्धा १६ जानेवारी रोजी गोगटे–जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. युवा गटासाठी १८ ते ३० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी “माझी मराठी शाळा” हा विषय देण्यात आला आहे. खुल्या गटातील ३० वर्षांपुढील स्पर्धकांसाठी “राजकारण : दिशा व दशा” हा विषय निश्चित करण्यात आला आहे. काव्यलेखनाची मर्यादा २० ओळी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी डॉ. आनंद आंबेकर (७०२०७३७४००) आणि सौ. गौरी सावंत-सावेकर (९६७३७१९५६८) यांच्याशी संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धा १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे. युवा गटासाठी “माझी मायबोली मराठी” तर खुल्या गटासाठी “हे विश्वची माझे घर” हा विषय देण्यात आला आहे. दोन्ही गटांसाठी भाषणाची वेळ सात मिनिटे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी विनायक हातखंबकर (९९७०३२३५४५), राजेंद्र कदम (७७९८३१००३३) आणि सौ. श्रद्धा बोडेकर (८६६८७०९३९०) यांच्याशी संपर्क साधता येईल.
कथाकथन स्पर्धा १५ जानेवारी रोजी अ. के. देसाई हायस्कूलमध्ये होणार आहे. युवा गटासाठी “ग्रामीण कथा” तर खुल्या गटासाठी “संस्कार कथा” हा विषय असून कथाकथनासाठी प्रत्येकी सात मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सौ. अंजली पिलणकर (९४०५६९०३८४), चंद्रमोहन देसाई (९७६४७९६६७६) आणि विद्याधर कांबळे (८४५९४५५४७२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी, युवक तसेच मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई आणि सचिव विद्याधर कांबळे यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

