रत्नागिरी : ठाण्यातील सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मेंदू/कवटी न उघडता अचूकपणे शस्त्रक्रिया करता येत असल्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. मणक्याच्या विकारांवरही याद्वारे उपचार करता येतात. सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयीचे (न्यूरॉलॉजी अँड स्पाइन) मोफत वैद्यकीय शिबीर रविवारी, १७ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शहरातील आर. बी. शिर्के हायस्कूलमध्ये सकाळी १० ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि सोलारिस हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे यांनी पत्रकार परिषदेत केले. (संपूर्ण व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला असून, त्यात या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेची झलकही पाहता येईल.)
शिबिराविषयी :
अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड-टाउन आणि रोटरी क्लब ऑफ अर्बानिया, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे ही मेंदूतील गाठीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. ज्यांना दीर्घकालीन डोकेदुखी, चक्कर येणे, व्हर्टिगो, फिट्स, नैराश्य, चिंता, पाठदुखी, मानदुखी, मेंदू व मणक्यांतील गाठी, न्यूरोपॅथी, हालचाल व संतुलनाशी संबंधित विकार, मायस्थेनिया ग्रॅव्हिस आदी समस्या आहेत, अशा रुग्णांना या मोफत शिबिराचा लाभ घेता येणार आहे. या रुग्णांनी आपले वैद्यकीय रिपोर्ट्स घेऊन शिबिराला यावे. तसेच नोंदणीसाठी विवेक महाकाळ ८६५५६९६४९६ आणि पुरुषोत्तम पवार ८४३३५२९४३५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)
न्यूरो नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाविषयी :
पत्रकार परिषदेत डॉ. अमित ऐवळे यांनी न्यूरो नेव्हिगेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. तसेच, शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असला, तरी विविध प्रकारच्या सरकारी योजना, संस्थांचे साह्य आणि हॉस्पिटलकडून दिली जाणारी सवलत यांमुळे हा खर्च खूप कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती अत्यंत चांगली सुधारली आहे. हीच नेव्हिगेशन तंत्रज्ञान प्रणाली मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठीही वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे मणक्यात स्क्रू अधिक अचूकपणे बसवण्यास मदत होते. स्पाइन फिक्सेशन शस्त्रक्रियेवेळी स्क्रू कोणत्या दिशेने आणि कोणत्या आकाराचे बसवायचे, याचे अचूक मार्गदर्शन या तंत्रज्ञानाद्वारे शल्यचिकित्सकांना मिळते.
डॉ. दीपक ऐवळे (न्यूरॉलॉजिस्ट) आणि डॉ. अमित ऐवळे (न्यूरोसर्जन) हे बंधू सोलारिस हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये मेंदूतील गाठ काढण्यासाठी अत्याधुनिक न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याच्या साह्याने नाकावाटे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येतात. ही अत्यंत कमी छेद घेतली जणारी (मिनिमली इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया असून, यामध्ये मेंदू अजिबात उघडला जात नाही. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, महिला रुग्णांच्या बाबतीत स्त्रीरोगतज्ज्ञ, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, तसेच न्यूरोसर्जन अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयाची आवश्यकता असते. हे सर्व वैद्यकीय विभाग सोलारिस हॉस्पिटलने एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ झाली. यामुळे रुग्णांची दृष्टी पुन्हा पूर्ववत करण्यात, तसेच कानाशी संबंधित समस्या दूर करण्यात यश मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांत सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ब्रेन ट्यूमर झालेल्या १००हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :
डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले, की ‘डोकेदुखी, दृष्टी कमी होणे, तसेच महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही मेंदूतील गाठीची लक्षणे असू शकतात. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आम्ही ट्यूमर काढण्यासाठी न्यूरो नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला. न्यूरो नॅव्हिगेशन हे मेंदूसाठी जीपीएससारखे असून, ते रिअल-टाइम इमेजिंगच्या मदतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना ट्यूमर किंवा समस्या असलेल्या भागांवर अचूकपणे लक्ष्य साधण्यासाठी मार्गदर्शन करते. हे प्रगत तंत्रज्ञान मेंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, कमी गुंतागुंतीची आणि अधिक अचूकरीत्या पार पाडते. मेंदूच्या कोणत्याही भागाला धक्का लागत नसल्याने महत्त्वाची कार्ये सुरक्षित राहतात आणि रुग्णाचे आरोग्य सुधारते. अचूकता, कमीत कमी छेद, कमी धक्का आणि प्रकृती जलद सुधारणे ही याची वैशिष्ट्ये आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे मेंदूच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांना लवकर घरी सोडले जाऊ शकते. अत्यंत गुंतागुंतीच्या शारीरिक रचनेत शस्त्रक्रिया नेमकेपणाने पार पाडण्यासाठी नॅव्हिगेशन तंत्रज्ञान शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येक टप्प्यावर मदत करते. हे उपकरण रुग्णांसाठी एक वरदान आहे. मेंदूमधील ट्यूमरच्या शस्त्रक्रियांव्यतिरिक्त, हे नॅव्हिगेशन उपकरण मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्येही अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे स्क्रू चुकीच्या जागी बसणे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड गळती, ड्युरल इजा अशा बाबी होण्याची शक्यता घटून संबंधित गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर सहा तासांच्या आत लक्षणीय सुधारणेसह हालचाल करता येते.”
पिट्युटरी अॅडेनोमा
डॉ. अमित ऐवळे यांनी एंडोस्कोपिक एंडोनाझल पिट्युटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरीदेखील नाकावाटे केली. (पिट्युटरी ग्रंथी शरीरात अत्यंत महत्त्वाची असून, तिला स्वामिनी ग्रंथी असे म्हटले जाते.) ही अत्यंत कमी छेद घ्यावा लागणारी (मिनिमली इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया आहे. पिट्युटरी ग्रंथीमध्ये होणाऱ्या गाठीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बहुतांश पिट्युटरी अॅडेनोमा हे कर्करोग नसलेले, परंतु पिट्युटरी ग्रंथीतील असामान्य वाढीमुळे निर्माण होणारे ट्यूमर असतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, पिट्यूटरी अॅडेनोमा होण्यासाठी जीवनशैली किंवा पर्यावरणाशी संबंधित ठोस कारणे आढळून आलेली नाहीत. या उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीवर पुढील अनेक महिने आणि वर्षे नियमित लक्ष ठेवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेनंतर न्यूरोसर्जनकडून रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. थकवा, पचनसंस्थेशी संबंधित त्रास, पित्ताशयातील खडे, तसेच दृष्टिसंबंधी समस्या यांसारख्या लक्षणांबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचेही डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले.
पिट्युटरी अॅडेनोमा हे तुलनेने सामान्य प्रकारचे ट्यूमर असून मेंदूतील एकूण गाठींपैकी सुमारे १० ते १५ टक्के गाठी या प्रकारातील असतात. भारतात दर वर्षी पिट्युटरी अॅडेनोमाचे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळून येतात. गाठीचा आकार आणि स्थान यांनुसार संप्रेरकांचे असंतुलन (हॉर्मोनल इम्बॅलन्स), डोकेदुखी आणि दृष्टीशी संबंधित समस्या अशी विविध लक्षणे दिसू शकतात. एंडोस्कोपिक एंडोनाझल पिट्यूटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरी या पद्धतीला या गाठी काढण्यासाठी प्राधान्य दिले जाते. कारण ही अत्यंत कमी छेद घ्यावी लागणारी शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कवटी उघडण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो आणि रुग्णांची रिकव्हरी अधिक वेगाने होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
अवघ्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत सोलारिस हॉस्पिटलने न्यूरॉलॉजी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वेगाने प्रगती करत आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे आणि न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे या सख्ख्या बंधूंनी मिळून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे जागतिक दर्जाचे हॉस्पिटल ठाण्यात उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये नाशिक, नांदेड, धुळे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आदी महाराष्ट्रातील विविध भागांतून रुग्ण उपचारांसाठी येतात.
https://solarishospitals.com/

