रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा बालवाचक कट्टा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुलांसाठी सुरू केलेल्या ‘बालवाचन कट्टा’ या अभिनव योजनेला पहिल्या दिवसापासूनच मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हा उपक्रम १० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

आजच्या डिजिटल युगात मुले मोबाइल आणि टीव्हीमध्ये व्यस्त असताना, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने वाचनालयाने या खास बालवाचन कट्ट्याचे आयोजन केले आहे. या योजनेअंतर्गत मुलांसाठी भरपूर वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये हॅरी पॉटर, फास्टर फेणे, फेमस फाइव्ह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लहान गोष्टींच्या स्वरूपातील थोर व्यक्तित्व, समाजसुधारक यांचा परिचय करून देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युद्ध कथा, साहसकथा तसेच १६९५ स्मार्ट रोबो-ए आय आणि औरंगजेब यासारखी विज्ञानाची, एआयबाबतची जिज्ञासा वाढवणारी पुस्तके यांचा समावेश आहे.

पालकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक पालक या उपक्रमाची माहिती घेऊन आपल्या पाल्याला ग्रंथालयाच्या सावलीत मुक्त वाचनासाठी प्राधान्य देत आहेत. हा उपक्रम १० जूनपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

ग्रंथालयात नोंद करणाऱ्या अशा ग्रुपला त्यातील बालवाचकांच्या संख्येनुसार गोष्टीरूप पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. ती वाचून झाली की पुन्हा दुसरी पुस्तके बदलून दिली जातील. या उपक्रमात सहभागी होऊन बालवाचकांनी एकत्र बसून वाचनाचा आनंद लुटावा अथवा ते शक्य नसल्यास ती आपल्या घरी नेऊन वाचावीत व ती वाचून झाली की पुस्तकात काय वाचले याची एका स्वतंत्र वहीत नोंद करून ठेवावी. उपक्रमाची मुदत संपताना या वह्या वाचनालयाकडे सादर कराव्यात. या नोंदवहीतील नोंदींचा आढावा घेऊन बक्षीस जाहीर केले जाईल. मात्र या नोंदी मुलांनी स्वतः केलेल्या व स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या असाव्यात.

या उपक्रमाबरोबरच जवळपासच्या मुलांसाठी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मोफत वाचनालय सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना बसून वाचता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुलेही या उपक्रमातील नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे या सुटीत मुलांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीची पुस्तके मनसोक्त वाचावीत व त्यावर व्यक्त व्हावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply