डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार जणांना करोनाची लस

रत्नागिरी : करोनाची लस डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात करोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेशी निगडित ११ हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यात शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आज (सात डिसेंबर) सोमवारी आरोग्य यंत्रणांची बैठक पार पडली. तीन टप्प्यांमध्ये ही लस दिली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची माहिती अद्याप शासनाने मागविलेली नाही. पहिल्या टप्प्यात करोना काळात आरोग्य यंत्रणा आणि या यंत्रणेबरोबर काम करणाऱ्या सर्वांनाच ही लस दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा सुमारे ८० शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सर्व कर्मचारी, आशा तसेच अंगणवाडी सेविकांना लस दिली जाईल. जिल्ह्यातील १३४ खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या ११ हजार जणांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे.

शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर यासाठी तयारी केली जात आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी सांगितले. या वर्षाच्या शेवटी ही लस उपलब्ध होणार असल्याने नवीन वर्षात एक चांगली सुरुवात होईल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply