कोकणातील नवोदित लेखकांसाठी सात निःशुल्क कार्यशाळांची संधी

पुणे : विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषदेने सात नि:शुल्क लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे. येत्या १० डिसेंबरपासून या कार्यशाळा सुरू होणार आहेत. कोकणातील नवोंदित साहित्यिकांसाठी ही मोठी संधी आहे.

विश्व मराठी परिषदेने येत्या जानेवारीत ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा ऑनलाइन लाइव्ह पद्धतीने १० ते १६ डिसेंबर या दरम्यान होणार आहेत. त्यामध्ये भारताबाहेरील ३५ देशातील, अमेरिकेतील ५० राज्यातील आणि भारतातील महाराष्ट्रासह २५ राज्यांतील मराठी भाषिकांना सहभागी होता येणार आहे.

या कार्यशाळांचे विषय असे : १) यशस्वी लेखक – कॉपीराइट, आयएसबीइन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इत्यादी. (१० डिसेंबर), २) कादंबरी लेखन (११ डिसेंबर), ३) संशोधन पद्धती आणि उपयोजन (१२ डिसेंबर), ४) अनुवाद कसा करावा (१३ डिसेंबर), ५) ब्लॉग लेखन (१४ डिसेंबर), ६) कथा लेखन (१५ डिसेंबर) आणि ७) कविता लेखन (१६ डिसेंबर).

या कार्यशाळांमध्ये भारत सासणे, लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. रेखा इनामदार-साने, अंजली कुलकर्णी, राजन लाखे, अॅड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळा १० ते १६ डिसेंबर या दरम्यान भारतीय वेळेनुसार रोज सकाळी ९ वाजता सुरू होतील. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी http://www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani येथे नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी दैदिप्य जोशी यांच्याशी (९०२१७३२३३७) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनानिमित्ताने नि:शुल्क ऑनलाइन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित लेखकांनी घ्यावा, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

कोकणातील आविष्काराला संधी
नैसर्गिक, भौगोलिक विविधतेबरोबरच कोकणातील लोकजीवनही विविधरंगी आणि विविधढंगी प्रकारांनी नटलेले आहे. अशा नानाविध अनुभवांचे साहित्यिक कलाकृतींमध्ये रूपांतर करून ते जगभर पोहोचविण्याची संधी विश्व मराठी संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेल्या मोफत कार्यशाळांमुळे उपलब्ध झाली आहे. त्यात कोकणातील नवोदित साहित्यिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे संस्थापक-अध्यक्ष क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply