करोनाचे रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन जानेवारी) करोनाचे १८ नवे रुग्ण आढळले, तर ११ जण बरे होऊन घरी गेले. सिंधुदुर्गात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर तीन रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, राजापूर आणि खेड या तालुक्यांत प्रत्येकी एक, तर चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांत प्रत्येकी पाच रुग्ण आढळले. अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी तालुक्यात पाच रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ९१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर सर्वाधिक ३७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ९२३० झाली आहे.

जिल्ह्यात आज ११ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८७६६ झाली असून, करोनामुक्तीचा हा दर ९४.९७ टक्के आहे.

चिपळूणमधील ८९ वर्षांच्या पुरुषाचा एक जानेवारी रोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३३० झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५७ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी (दोन जानेवारी) १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार कोविड-१९च्या तीन जणांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५१४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ५८९९ एवढी झाली आहे. आज कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५७ एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply