काजव्यांबरोबरच मानवाचे भविष्यही झपाट्याने होत चालले अंधूक

पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. बच्चे कंपनी काजव्यांच्या मागे पळून दहा-पंधरा मिनिटात शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवत असे. तो एक वेगळाच आनंद असे. अवघ्या २५-३० वर्षांत चित्र पूर्ण पालटले आहे. आज तासभर अंधारात फिरल्यानंतर एखादा काजवा दिसला तर नशीब, असे मानायची वेळ आली आहे. हे काजवे गेले तरी कुठे? त्यांचे भविष्य काय? त्यांचा जीवनक्रम कसा असतो? काजवे काय खातात? ते कसे चमकतात?पालघर येथील नीता चौरे यांचा लेख

काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात. जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जाते. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामध्ये किंवा पाणथळ जागांच्या शेजारी, किंवा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळ्यात घातली जातात. काजव्याची अंडी आणि अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाहेर येते. मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष. या काळात ती छोटेमोठे किडे, शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई इत्यादी खाऊन फस्त करतात. नंतर काजव्याच्या अळ्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात.

प्रत्येक वेळी जेव्हा अळ्यांचा आकार वाढतो, तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात. तेथे त्या फुलपाखराप्रमाणे कोषरूप धारण करतात. हा काळ वेळ मे- जून महिन्याचा असतो. पावसाच्या एक-दोन जोरदार सरी येऊन गेल्यानंतर त्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात. आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते. आता ते हवेत उडणारे लहान-मोठे कीटक खातात. त्याशिवाय ते स्वजातीभक्षणदेखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्धतीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाची वारंवारिता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. त्यामुळेच हे काजवे आपल्या जातीचे नर आणि माद्यांना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या माद्या इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धतीची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात आणि त्याला भक्ष्यदेखील बनवतात.

असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्याजवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादीसोबत मीलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुधा बरेच नर काही न खाता केवळ मीलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादीदेखील अंडी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मरून जाते. आता अंड्यातून अळी, अळीपासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अशा रीतीने काजवे विविध टप्प्यांमधूनजमिनीवर काढत असतात.

पनवेलमधल्या ऐश्वर्या श्रीधर नावाच्या २३ वर्षांच्या भारतीय फोटोग्राफरला २०२०मध्ये लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने टिपलेला फोटो होता एकाच वेळी हजारो काजव्यांनी तेजाळून टाकलेल्या झाडाचा आणि त्या फोटोला ऐश्वर्याने नाव दिलं होतं – लाइट्स ऑफ पॅशन.

काजवे पूर्वी खूप दिसायचे. कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या. ठिकठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे पाणी काठोकाठ भरलेले असे. परिणामी जमिनीतील आर्द्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे. त्यावेळी मोठमोठी गवताची कुरणे अस्तित्वात होती. उंच वाढलेल्या दाट गवतामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नसे. त्यामुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आर्द्रता टिकून राहत असे. शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे. अशा ठिकाणीदेखील आर्द्रता चांगल्या प्रकारे राहत असे. तेथेच असलेल्या खेकड्याच्या कोरड्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. पुढे हळूहळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेली. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता पावसाळा संपल्यानंतर टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण नष्ट झाले.

शेतातदेखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली. त्यामुळे इतर उपद्रवी कीटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसारख्या शेतीस उपयुक्त कीटकदेखील नष्ट झाले. उरली सुरली कसर वाढत्या शहरीकरणाने पूर्ण केली. त्यामुळे अगदी थोडावेळ मीलनासाठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्री लावलेले एलईडी आणि इतर झगमगाटामुळे दिपून गेले. त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखी घट होत गेली. पुढे निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडी आणि आधुनिकीकरणामुळेही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरून कायमचे नष्ट होण्याच्या स्थिती आले आहेत. अशा ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली. तेथे नाइट ट्रेल करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. त्यामुळे काजव्यांना घनदाट जंगलातदेखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.

माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप बदलत चालली आहे. आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो. त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो. नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला पाहिजे तसे उपभोगायचे आणि पैसे फेकून मोकळे व्हायचे. याच वृत्तीमुळे आज सर्वत्र पृथ्वीवरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे. अवघ्या ३० वर्षांत काजव्यापाठोपाठ असे कितीतरी बहूपयोगी कीटक आपण संपवले आहेत. त्याचाच खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे.

पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक भूषण वि. भोईर यांनी तर धोक्याचा मोठा इशारा दिला आहे. ते म्हणतात, निसर्गाच्या काठीला आवाज नसतो. कधी तो करोना बनून तर कधी अंफान, निसर्ग यांसारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या केवळ ५ वर्षांत जागतिक तापमानवाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत. संपूर्ण मानवासहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता तरी निसर्गाची हाक ऐकून पुन्हा नैसर्गिक शेती आणि माती-कुडाच्या घरात जा. तसे करणे मागास मुळीच नाही. तेच खरे शाश्वत जीवन आहे.

  • नीता चौरे, पालघर
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply