रत्नागिरीत १६, सिंधुदुर्गात ३१ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवारी) १६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ करोनामुक्त झाले. रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात नवे ७ करोनाबाधित आज आढळले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज १६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ८२८ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.१४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत एक, तर चिपळूणमध्ये ४, रॅपिड अँटिजेन चाचणीत दापोलीत ३, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १, तर चिपळूणमध्ये २ रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १२). एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार २७८ झाली आहे. आज आणखी २५१ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार २६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज चिपळूण तालु्क्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू नोंदविला गेला. हा मृत्यू गेल्या २८ डिसेंबर रोजी झाला होता. त्याची नोंद आज झाली. मृतांची एकूण संख्या आता ३३२ झाली असून मृत्युदर ३.५७ झाला आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ३१ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५६७ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९४० एवढी झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १६० एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply