पत्रकार दिनी सत्कारमूर्तीने पत्रकार आणि पाहुण्यांनाही भारावून टाकले

रत्नागिरी : मराठी पत्रकार दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ रत्नागिरीत आज (६ जानेवारी) झाला. या समारंभातील एका सत्कारमूर्तीने यजमान पत्रकार आणि पाहुणे पोलीस अधिकारी यांनाही भारावून टाकले!

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक एस. एल. पाटील (गृह), शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता महाडिक, अध्यक्ष राजेंद्र चव्हाण होते. यंदा प्रथमच ज्येष्ठ पत्रकार पै. रशीद साखरकर यांच्या नावे ‘के टीव्ही’चे वृत्त संपादक अलिमियाँ काझी यांना पत्रकार गौरव पुरस्कार देण्यात आला. पत्रकार सन्मान पुरस्कार ‘तरुण भारत’चे प्रमुख सुकांत चक्रदेव यांना, केटीव्हीचे कॅमेरामन सचिन बोरकर यांना व्हिडिओ जर्नालिस्ट पुरस्कार, ‘दै. सागर’च्या बातमीदार मीरा शेलार यांना पत्रकार भूषण पुरस्कार आणि पालिकेच्या वाहन विभागाचे प्रमुख जितेंद्र विचारे यांना पत्रकार मित्र सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री. वाघमारे यावेळी म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार अनेकदा उजेडात न येता पडद्यामागून काम करतात. अनेक पत्रकार निर्भीड आहेत, अन्याय होत असलेल्या ठिकाणी न्याय मिळवून देतात. त्यांनी वंचित, उपेक्षित समाजाचे दुःख समोर आणावे. त्यातून सकारात्मक दृष्टी ठेवावी.

शहर पोलिस निरीक्षक लाड म्हणाले की, पत्रकार काम करत असतात आणि अशा पुरस्कारांतून त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते. जे चुकते, त्यावर बोट ठेवून दुरुस्त करायला पत्रकार लावतो, हे जोखमीचे काम पत्रकार करत असतात. जगभरात लेखणीमुळे अनेक कामे होतात, हे आजवर दिसून आले आहे.

यावेळी उपअधीक्षक एस. एल. पाटील यांनी पत्रकारांची स्तुती केली. आव्हानात्मक काम करताना होणाऱ्या संघर्षाला सामोरे जात असल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी अलिमियाँ काझी म्हणाले, आज ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अलीकडे लेखणीची धार कमी झाली आहे. चुकते ते दाखवले पाहिजे. जे घडते ते पोहोचवले पाहिजे. राज्यकर्त्यांना वठणीवर आणले पाहिजे, तरच लेखणीचा मान राहील.

सुकांत चक्रदेव म्हणाले, मी फार मोठे कार्य केले नाही, अजून चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रसंगातून नव्या गोष्टी मिळत असतात. नवे ज्ञान मिळाले की नवा जन्म होतो, असे म्हणतात. पत्रकार म्हणून अनेकदा संघर्ष करावा लागतो. अनेक महनीय व्यक्ती आधी पत्रकार होते, मग ते महात्मा गांधी असोत वा अटलबिहारी वाजपेयी. माझा संघर्ष माझ्याशीच आहे, असे समजून काम केले पाहिजे.

समारंभात सत्कारमूर्ती जितेंद्र विचारे यांचे भाषण अत्यंत लक्षवेधी झाले. श्री. विचारे करोनाच्या काळात बजावलेली मोठी जबाबदारी लक्षात घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. विचारे यांनी व्यक्त केलेले विचार पत्रकारांना, पोलीस अधिकाऱ्यांना आणि समाजालाही विचार करायला लावणारे होते. श्री. विचारे यांनी करोनामुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम निभावले. सुमारे ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला त्यांनी हातभार लावला. सप्टेंबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसांत ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. याबाबत ते म्हणाले, आम्ही काही वेगळे केले नाही. शासनाकडून आम्हाला वेतन मिळत होते. पण ते काम करत असताना समाजातील दुःखाची जाणीव झाली. घरातला तरुण करोनामुळे गेल्याचे पाहिले. एक स्त्री आपल्या पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कराल का, असे विचारायला आली होती. तिच्यासोबत तिचा चौथीत शिकणारा मुलगा होता. गावात अंत्यसंस्काराला बंदी असल्यामुळे तुम्ही माझ्या पतीवर अंत्यसंस्कार कराल का, अशी याचना तिने केली. एका महिलेला अशा कामासाठी यावे लागले, याचे वाईट वाटले. आज ते प्रसंग आठवले तरी डोळ्यांतून पाणी येते. अशा अनेक घटना पाहिल्या. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. त्यांना आधार देण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे. आमचा सत्कार केला ते ठीक आहे, पण असे कितीतरी लोक करोनामुळे त्रासून गेले आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, असे श्री. विचारे यांनी सांगितले. आपण निभावलेल्या अंत्यसंस्कारांविषयी माहिती देताना श्री. विचारे भावूक झाले. त्यामुळेच साऱ्या सभागृहाचे मन हेलावून गेले. पत्रकार दिन समारंभाचे ते परमोच्च क्षण ठरले.

यावेळी फिनोलेक्स कंपनीचे जनरल मॅनेजर टी. के. काकडे, श्री. चिवटे यांनीही पुरस्कारप्राप्त पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कंपनीला सहकार्य करत असल्याबद्दल पत्रकारांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नीलेश जगताप, मेहरून नाकाडे, सचिव राजेश कळंबटे, राजेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली. राजेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजेश कळंबटे यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply