मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (११ जानेवारी २०२१) नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष वास्तुविशारद संजय पाटील स्मारक समितीचे अॅड. विलास लोणारी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्‍या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. एक वर्षाआड दिल्या जाणार्‍या जनस्थान पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. यापूर्वी विजया राजाध्यक्ष, अरुण साधू, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

लवकरच वयाची नव्वदी पूर्ण करणार असलेले मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करूळ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. कथा, कादंबऱ्या, कविता असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. केवळ अंगभूत लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने ते जीवनात यशस्वी झाले. ‘माझ्या भावी आयुष्याचं प्रशिक्षण माझ्या बालपणीच्या काटेरी दिवसांनी केलं’ असे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

मॅट्रिकला असतानाच त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. रत्नाकर, लोकसत्ता, धनुर्धारी, विविधवृत्त अशा मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत गेल्या. तसेच आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण भारत, मनोहर अशा नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले होते. मराठी साहित्यात त्यांनी आपल्या वेगळ्या आणि विपुल लेखनाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्‌मय अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून त्यांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला आहे.

रत्नागिरीत १९९० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याच संमेलनात कोकण मराठी साहित्य परिषदेची बीजे रोवली गेली आणि वर्षभरातच ती साकारली. कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून त्या साहित्य चळवळीमार्फत सातत्याने जागोजागी संमेलने, कथा, काव्यवाचन, चर्चा-वादविवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मधुभाईंनी पुढाकार घेतला आहे. मालगुंड या केशवसुतांच्या जन्मस्थळी त्यांचे यथोचित स्मारकही कोमसापतर्फे उभारण्यात मधु मंगेश कर्णिक यांचा सिंहाचा वाटा आहे.

माहीमची खाडी, माझा गाव माझा मुलुख, भाकरी आणि फूल, जुईली, कमळण, करुळचा मुलगा, कातळ, लागेबांधे, सोबत, सृष्टी आणि दृष्टी, सूर्यफूल/सनद, तारकर्ली, अबीर गुलाल, देवकी, हृदयंगम, जगन नाथ आणि कंपनी, जिवाभावाचा गोवा, कोवळा सूर्य, राजा थिबा, संधिकाल, शाळेबाहेरील सौंगडी, विहंगम, पांघरूण, जैतापूरची बत्ती ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांना गदिमा पुरस्कार, कर्मयोगी पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचेही अध्यक्षपद काही काळ भूषविलेल्या मधुभाईंना त्याच प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक तुरा आहे. त्यांना येत्या १० मार्च रोजी नाशिक येथे होणार्‍या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

करूळ हा माझा गाव. माझा जन्म तिथला. आयुष्याचा बराचसा भाग मी त्या गावात घालवला. लेखकपणाचं बीज त्याच गानात रुजलं. त्या गावाने मला घडवलं. म्हणून त्या गावाचा लहानपणी मी मुलगा होतो – अजूनही तसाच आहे, असं मनातून वाटतं; पण गाव आता खूप बदलला आहे व मीही पूर्वीचा राहिलेलो नाही!

बालपणातील दिवसांची छाया माणसाला आयुष्यभर सोबतीसारखे पुरते. लेखकासाठी तर बालपण फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. ‘The best early training for a writer is an unhappy childhood’ असं हेमिंग्वे म्हणून गेला आहे. माझ्या भावी आयुष्याचं प्रशिक्षण माझ्या बालपणीच्या काटेरी दिवसांनी केलं. नंतरच्या प्रौढ वयातील शिक्षण – ‘लर्निंग’ या अर्थाने – परिस्थितीने मला दिलं. माझ्या बाबतीत ‘ट्रेनिंग’ आणि ‘लर्निंग’ घराने आणि जगाने पार पाडलं. त्यामध्ये मी अजूनही एक मुलगा, एक विद्यार्थीच राहिलो आहे.

  • मधु मंगेश कर्णिक
    (‘करूळचा मुलगा’ या पुस्तकाच्या ‘मनोगता’मधून…)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply