रत्नागिरी जिल्ह्यात नऊ ठिकाणी करोना लसीकरण

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात येत्या शनिवारी (१६ जानेवारी) होणार आहे. पाच रुग्णालये आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह नऊ ठिकाणी पहिल्या टप्प्यातील लसीकरण होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या १० महिन्यांपासून सर्वजण करोना व्हायरसच्या विरोधात एकत्रितपणे लढाई लढत आहेत. कोविड-१९ आजारावर उपचारासाठी सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्यावर प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय असलेले लसीकरण शनिवारी सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, दापोली आणि कामथे उपजिल्हा रुग्णालय, गुहागर आणि राजापूर येथील ग्रामीण रुग्णालय या ५ ठिकाणी ५०० जणांना लस दिली जाणार आहे. या दिवशी त्या त्या आरोग्य संस्थेतील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. उपजिल्हा रुग्णालय, दापोली, कामथे (ता. चिपळूण), गुहागर आणि राजापूर या ४ ठिकाणी १०० पेक्षा कमी संख्येने कर्मचारी असल्यामुळे आसूद (दापोली), अडरे (चिपळूण), आबलोली (गुहागर) आणि धारतळे (राजापूर) या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचार्यांवना लस दिली जाणार आहे. ज्यांना उच्च रक्तीदाब, मधुमेह, दमा इत्यादी दीर्घ आजार आहेत, त्यांना ही लस सध्या दिली जाणार नाही.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लशीचे १६ हजार ३३० डोस रत्नागिरीत उपलब्ध झाले आहेत. ही लस दंडावर स्नायूमध्ये प्रत्येकाला ०.५ मि.लि. या प्रमाणात तसेच २८ दिवसांच्या अंतराने २ डोसेस या प्रमाणात दिली जाणार आहे. दोन्ही डोस एकाच लस उत्पादक कंपनीच्या लशीचे दिले जाणार आहेत.

लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष अशा प्रकारे तीन कक्षांची रचना केली असून संपूर्ण लसीकरण प्रक्रिया ५ प्रशिक्षित सदस्यीय लसीकरण पथकाद्वारे पार पाडली जाणार आहे. ज्यांची नोंदणी यापूर्वी झाली आहे, त्यांनाच ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाबाबतचा एसएमएस संबंधित व्यक्तीच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर पाठविला जाईल. या एसएमएसची खात्री केल्यानंतर त्याला प्रतीक्षा कक्ष आणि त्यानंतर लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल. लसीकरण कक्षामध्ये लाभार्थीने नोंदणीच्या वेळी दिलेल्या ओळखपत्राची (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक) खात्री करून कोविन अॅपमध्ये नोंद करून लसीकरणासाठी पाठविण्यात येईल. लसीकरण झाल्यांनतर निरीक्षण कक्षामध्ये अर्ध्या तासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. निरीक्षणादरम्यान लसीकरणानंतर काही खाज, चक्कर, उलटी इत्यादी काही समस्या उद्भवल्यास त्यावर उपचार केले जातील. निरीक्षण कालावधीमध्ये कोणतीही समस्या उद्भवली नाही, तर त्या व्यक्तीला पुढील डोसची तारीख सांगितली जाईल. तसेच मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, २ मीटरचे अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, चेहऱ्यास हात न लावणे इत्यादीबाबतच्या सूचना दिल्या जातील. घरी गेल्यानंतर काही त्रास उद्भवल्यास जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याच्या सूचनाही दिल्या जातील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञांकरवी पुढील उपचार दिले जातील.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण पार पडल्यानंतर शासन निर्देशानुसार अन्य लाभार्थीसाठी लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply