सिंधुदुर्गनगरी : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाची लस दाखल झाली आहे. कोल्हापूर येथून वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर आज संध्याकाळी लस घेऊन जिल्ह्यात दाखल झाले.
सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडारातील शीतगृहांमध्ये सध्या या लसीची साठवणूक करण्यात आली आहे. लस जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी डॉ. संदेश कांबळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर यांच्यासह औषध भांडारातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, साहित्या याबाबतची पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
येत्या शनिवारी (दि. १६ जानेवारी) जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १० हजार २६० डोसेस उपलब्ध झाले आहेत. त्यातून साडेचार हजार लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. ही मोहीम सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा रुग्णालय, तसेच सावंतवाडी आणि कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू होत आहे. या तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेले आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. प्रारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
