सुभाषित संग्रह संकलित करण्याचा संकल्प सोडून श्रीकांत वहाळकर यांना श्रद्धांजली

रत्नागिरी : ‘ज्ञानातच कर्माचे सार्थक’, ‘संस्कृतचा आम्ही चालवू हा पुढे वारसा’ असे सांगत संस्कृत शिक्षक कै. श्रीकांत वहाळकर यांनी संकलित केलेल्या सुभाषितांचा संग्रह प्रकाशित केला जाईल, असा संकल्प संस्कृत भारतीच्या अध्यक्ष तथा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी सोडला. कै. वहाळकर यांच्या श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या.

गेल्या १ जानेवारीला वहाळकर यांचे निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा संस्कृत भारतीतर्फे शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात झाली. व्यासपीठावर रा. स्व. संघाचे द. रत्नागिरी संघचालक आनंद मराठे, वहाळकर यांचे सुपुत्र सचिन वहाळकर, शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, संस्कृत शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष सौ. रेखा इनामदार, डॉ. आठल्ये आदी उपस्थित होते.

सचिन वहाळकर म्हणाले, वडिलांमुळे संघाचे संस्कार झाले. इंग्रजी बातम्यांचे वाचन करू संपादक गोविंद तळवलकरांचे अग्रलेखही वाचू लागलो. अत्यंत गरिबी असली तरी संघामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे ते नेहमी सांगत. त्यांनी १५ हजार सुभाषितांचा संग्रह केला आहे. त्यांच्या प्रकाशनासाठी कुटुंबीय म्हणून सहकार्य करू. तसेच संस्कृत प्रचारासाठी लागणाऱ्या योगदानाची ग्वाही त्यांनी दिली.

गीता मंडळाचे प्रमुख अॅड. मिलिंद पिलणकर यांनी गीता जयंती, गीता मंडळ या अनुषंगाने वहाळकर सरांच्या आठवणी जागवल्या. जो स्वतःला ओळखतो, तो कोणाशी किती संपर्क ठेवायचा हे जाणतो, हे वहाळकर सरांना माहीत होते. अखेरपर्यंत त्यांनी गीता जयंती कार्यक्रम कधीही चुकवला नाही. आयुष्यभर संस्कृत व गीता मंडळासाठी त्यांचे योगदान होते.

सागरी सीमा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा समितीने (पूर्वीचे शिवछत्रपती मंडळ) झाडगाव येथे विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. त्यावेळी दादा इदाते यांच्यासमवेत वहाळकर यांच्याबरोबरच पाच जण पहिले विद्यार्थी होते. संघ कार्यात त्यांचे लहानपणापासूनच योगदान होते.

वहाळकर सर म्हणजे शिस्तप्रिय शिक्षक. त्यांच्याविषयी प्रेमळ पण आदराची भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात होती. शंका विचारणारे विद्यार्थी त्यांना आवडत असत. ज्या काळी व्यवसाय मार्गदर्शन मिळत नव्हते, तेव्हा रत्नागिरीत सर्वप्रथम त्यांनी ते सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना करिअरची दिशा दाखवली, असे गायत्री गुळवणी यांनी सांगितले.

निवृत्त शिक्षिका वंदना घैसास यांनी दिल्लीमध्ये संस्कृत संवाद शाळा, पाठ्येतर संस्कृत परीक्षा घेण्यासंबंधी वहाळकर सरांचे योगदान सांगितले. सहकार्यवाह नथुराम देवळेकर यांनी ध्येयनिष्ठ, स्मरणिका प्रकाशनासंदर्भात सरांचे मार्गदर्शन याविषयी सांगितले. संस्कृत शिक्षिका सौ. बापट, संस्कृत संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण जोशी यांनी संस्कृत संघटनेविषयी वहाळकर सरांच्या आठवणी जाग्या केल्या.

अस्मिता फाटक आणि स्मिता जोशी यांनी सांगितले की, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृतविषयक प्रकल्पाबाबत वहाळकर यांना निधनाच्या आधी दोन दिवस भेट झाली होती. तेव्हा त्यांनी त्यांचा जीवनपट उलगडला होता. निवृत्तीनंतरही ते संस्कृतसाठी कार्यरत राहिले. संस्कृत शिक्षकांचे प्रश्नन सोडवण्यासाठी संघटना उभी करून १९७८ पासून ते त्यासाठी कार्यरत होते.

यावेळी नारायण भगिनी मंडळातील महिलांनी भगवद्गीतेतील श्लो क पठण केले. आशीष आठवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संस्कृत शिक्षक, स्नेही मंडळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply