नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्ल्यात साकारणार संकुल

वेंगुर्ले : लोकनेते नाथ पै यांचे संपूर्ण जीवन दीपस्तंभाप्रमाणे असून त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या नावे वेंगुर्ले येथे ५० लाख रुपये खर्च करून एक संकुल उभारण्यात येईल. त्यांचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

अदिती पै यांनी लिहिलेल्या बॅरिस्टर नाथ पै लढवय्या देशभक्त । द्रष्टा लोकनेता । असामान्य संसदपटू या मराठी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत आज वेंगुर्ले येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नाथ पै यांचे व्यक्तिमत्व केवळ कोकण आणि महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांनी केलेले प्रचंड काम सर्वांसाठी प्रेरक आहे. नाथ पैंचा जीवनपट म्हणजे एक अग्निपथ होय. बेळगाव महाराष्ट्रात यावे, तसेच मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी त्यांनी केलेल्या प्रखर संघर्षाचा आणि गोवामुक्तीच्या कष्टप्रद लढ्याचाही त्यात समावेश आहे.

श्री. सामंत म्हणाले, त्यांच्याविषयीचे पुस्तक वाचत असताना नाथ पै यांच्या जीवनातील असंख्य गोष्टींची नव्याने ओळख झाली. या पुस्तकात एकूण ३५ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात नाथ पै यांच्याबद्दल अत्यंत ओघवत्या शैलीत अदिती पै यांनी लिहिले आहे. नाथ पै यांचे जीवन सर्वांगाने विशाल आहे. ते अत्यंत मार्मिकपणे आणि स्पष्टपणे लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे.

नाथ पै यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या नावे वेंगुर्ले येथे ५० लाख रुपये खर्च करून एक संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलात व्यायामशाळा, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातील. तसेच नाथ पै यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. या संकुलासाठी आणखी निधी लागला, तर त्याची तरतूदही करण्यात येईल. राज्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये नाथ पैंचे हे चरित्र उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री. सामंत यावेळी म्हणाले.

नाथ पैंच्या वक्तृत्वाबद्दल सगळे जण जाणतात. लोकसभेतील त्यांच्या पहिल्याच प्रभावी आणि चमकदार भाषणाने त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनाही त्यांना चहापानाचे आमंत्रण दिल्यावाचून राहवले नाही. लोकसभेतील चौदा वर्षांची त्यांची कारकीर्द अत्यंत प्रेरक होती. या पुस्तकाच्या माध्यमातून नाथ पैंचे संपूर्ण आयुष्य समजून घेता येईल. प्रेरणेचा अखंड स्रोत असणाऱ्या नाथ पै यांच्या आयुष्याकडे पाहून आपणही यासम व्हावे, हा विचार तरुणाईच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले. नाथ पैंचा संसदेतील वावर असो की त्यांची जनसामान्यांसोबत असलेली नाळ असो, ती आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र कोकण रेल्वेच्या पूर्णत्वाचा निर्धार पै यांनी केला होता. यामुळे नाथ पै हे कोकण रेल्वेचे खरे निर्माते आहेत.

लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना नाथ पै समजण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच पैंच्या स्मृतिदिनानिमित्त सीमावाद मिटावा, हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

यावेळी, संजय पडते, शैलेंद्र पै, देवदत्त परुळेकर, कमलताई परुळेकर, बापू अवसरी, उमेश गाळवणकर, जयप्रकाश चमणकर, अतुल बंगे, शैलेश परब, सुनील डुबळे, बाळू परब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply