रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला थोर चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने केली आहे. ही माहिती भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. रत्नागिरीने देशाला अनेक नररत्ने दिली. त्यापैकी चरित्रकार धनंजय कीर एक होत. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे लेखन हे अपूर्व लेणे आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, स्वा. सावरकर यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींची आणि राजकीय नेत्यांची, समाजसेवकांची चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. रत्नागिरी शहरात त्यांचा जन्म झाला. तेली आळीनजीक पाटीलवाडीत त्यांचे घर आहे. आजच्या आणि पुढील पिढीला या आंतराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकाचे स्मरण चिरंतन राहावे, म्हणून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सर्व समाज आणि जाती, धर्मांच्या वतीने करण्यात आली आहे. उपकेंद्रात चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या ग्रंथसंपदेचे एक दालन उभारावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला कै. धनंजय कीर यांचे नातू डॉ. शिवदीप कीर, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, सुरेंद्र घुडे, भंडारी समाज संघाचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, उद्योजक सुनील भोंगले, मराठा ज्ञातीचे सुधाकर सावंत, तेली समाजाचे रघुवीर शेलार, कुणबी समाजाचे अॅड. सुजित झिमण, त्वष्टा समाजाचे दादा पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर, पंचायत समिती सदस्य सौ. स्नेहा चव्हाण, नगरसेविका सौ. दया चवंडे आदी उपस्थित होते
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
